Subodh Bhave Post for Priya Marathe: आज मराठी चित्रपटसृष्टीतून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद वार्ता समोर आली आहे. मराठी व हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री प्रिया मराठेचे केवळ 38 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली. प्रियाच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून चाहत्यांसह अभिनेत्रीच्या सहकलाकारांही मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा - Priya Marathe Passed Away: ...आणि प्रियाची कर्करोगाशी झुंज अपयशी, कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया
प्रिया मराठेच्या अचानक जाण्याने अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला असून अभिनेता सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सुबोध भावे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'प्रिया मराठे ही एक उत्तम अभिनेत्री होती. काही मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये ती माझी सहकलाकार होती, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती माझी चुलत बहीण होती. तिची मेहनत, कामावरील श्रद्धा आणि प्रत्येक भूमिकेतली समर्पितता कौतुकास्पद होती. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचे निदान झाले होते. तरीसुद्धा तिने खंबीरपणे लढा देत पुन्हा कामाला सुरुवात केली. नाटकं, मालिका यांमधून आपल्या सुंदर अभिनयाने ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आली. पण त्या कॅन्सर ने काही तिची पाठ सोडली नाही.'
हेही वाचा - Actress Priya Marathe Passed Away : अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन
सुबोध भावेंनी पुढे लिहिलं की, 'तू भेटशी नव्याने' या मालिकेदरम्यान तिचा त्रास पुन्हा उफाळून आला होता. या प्रवासात तिचा जोडीदार शांतनू मोग्हे नेहमी तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. माझी बहीण खरी लढवय्या होती, पण अखेरीस तिची ताकद कमी पडली. प्रिया, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. जिथे असशील तिथे तुला शांती लाभो हीच प्रार्थना... ओम शांती.'