मुंबई: 'आई कुठे काय करते' या मालिकेत 'संजना'ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. आपल्या अभिनय कौशल्याने आणि ग्लॅमरस अंदाजाने ती सतत चर्चेत असते. नुकताच, रुपालीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात रुपाली गाडी चालवताना दिसत आहे. यादरम्यान, तिने रस्त्याच्या वाईट स्थितीबद्दल एक व्हिडिओ बनवून आपला संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रस्त्याच्या अवस्थेवर रुपालीचा संतापजनक व्हिडिओ
रुपालीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती घोडबंदर रोडवरून जात होती. हा प्रवास करताना तिने घोडबंदर रोडवरील वाईट परिस्थितीवर संताप व्यक्त केला. रुपाली म्हणाली की, 'काय अवस्था आहे या रस्त्याची? किती वर्ष झाली हा असा प्रवास करायचा? 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी 'आई कुठे काय करते' च्या शूटिंगसाठी विरारहून यायचे, तेव्हा सुद्धा हा रस्ता असाच होता. आज सुद्धा रात्रभर शूट करून जेव्हा मी पहाटे 5:30 ला घरी निघाले, तर तर ह्या घोडबंदरला आधी ट्रैफिक आणि मग हा सुंदर रस्ता. 12/14 तासांचा शूट आणि मग २ तासांचा हा प्रवास कधी नीट होणार?'.
सध्या, रुपाली भोसले 'स्टार प्रवाह'वरील लवकरच सुरू होणाऱ्या ‘लपंडाव’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेच्या शूटिंगसाठी तिला ठाणे ते सेटपर्यंत घोडबंदर मार्गे प्रवास करावा लागतो. मात्र, या प्रवासादरम्यान तिला घोडबंदर रोडवरील खड्ड्यांतून जावं लागतं. त्यानंतर पुढील अर्ध्या तासाचे अंतर पार करायला दोन तास लागतं, असं देखील रुपाली म्हणाली.