मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात 'हिंदी विरुद्ध मराठी' या मुद्द्यावरून राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापले आहे. हिंदी भाषा सक्तीबद्दलच्या निर्णयावर मनसे आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच, 26 जून रोजी पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी, '5 जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मोर्चा काढण्यात येणार', अशी घोषणा केली. यासह, 'अनेकांनी या मोर्चात सहभागी व्हावं', असं आवाहन त्यांनी केलं आहे.
हेही वाचा: सोमवारपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू
कोण आहे 'ही' मराठमोळी अभिनेत्री?
या मोर्चात मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजस्विनी सतत राजकीय आणि सामाजिक मतं शेअर करत असते. यासोबतच, राज ठाकरेंबद्दलच्या अनेक पोस्टही तेजस्विनी शेअर करत असते. 27 जून रोजी मनसेनेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी तेजस्विनीने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती.

'मराठीसाठी, मराठी माणसांसाठी निघणाऱ्या मोर्च्याचं स्वागत आणि त्याला पाठिंबा आहे. मोर्चा हा ‘मराठी माणसासाठी’ असेल आणि त्याचं नेतृत्व ‘मराठी माणूस’ करेल ही अपेक्षा. मी तर येईनच, पण महाराष्ट्रावर, मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती, ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी या', असं आवाहन तेजस्विनीने केलं.
पुढे तेजस्विनी म्हणाली की, 'आता स्थगिती नको, तर निर्णय हवा आहे'. यासोबतच गुगल फॉर्मद्वारे 'आपण हिंदी सक्तीला विरोध नोंदवावा', असंही तिने म्हटलं आहे. यासह तेजस्विनी म्हणाली की, 'विरोध भाषेला नाही, सक्त्तीला आहे'.
राज ठाकरे काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, 'राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधातला मोर्चा येत्या 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर काढण्यात येणार आहे'. यादरम्यान, सरकारच्या हिंदी भाषेच्या निर्णयावर हेमंत ढोमे, अरविंद जगताप, सचिन गोस्वामी, प्रथमेश शिवलकर, समीर चौघुले, मकरंद अनासपुरे, वैभव मांगले यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.