मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या बहुप्रतिक्षित दि बंगाल फाईल्स चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दि ताश्कन फाईल्स आणि दि काश्मिर फाईल्स या चित्रपटांच्या प्रसिद्धीनंतर फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री बंगालमधील विदारक सत्य घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 1947 मधील देशाच्या फाळणीदरम्यान आणि त्यानंतर बंगालच्या भूमीवर घडलेल्या धर्मांतर युद्धाची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. दि काश्मिर फाईल्सनं दुःख झाले असेल, परंतू दि बंगाल फाईल्स तुम्हाला थरारक अनुभव देईल, अशी टॅगलाईन ट्रेलरसोबत देण्यात आली आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शनिवारी आरोप केला की कोलकाता पोलिसांनी त्यांच्या 'द बंगाल फाइल्स' चित्रपटाचा ट्रेलर लाँच थांबवला. 1946 च्या कोलकाता दंगलींवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर दुपारी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लाँच होणार होता. मात्र कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. "जर ही हुकूमशाही नाही तर मग काय आहे?... तुमच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे आणि म्हणूनच सर्वजण 'द बंगाल फाइल्स'ला पाठिंबा देत आहेत" असे विवेक अग्निहोत्री यांनी मत व्यक्त केल्याचं एएनआयने म्हटले आहे.