मुंबई: कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी नुकताचं कॅनडामध्ये कॅफे सुरू केला होता. परंतु, गुरुवारी संध्याकाळी एका दहशतवाद्याने या कॅफेवर गोळीबार केला. यानंतर आता कपिल शर्माच्या टीमकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कॅनडाच्या सरे भागात अवघ्या सात दिवसांपूर्वी उघडलेल्या त्यांच्या कॅफेला खलिस्तानी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. कॅफे उघडल्यापासूनच त्याचे खूप कौतुक केले जात होते. कपिलच्या कॅफेच्या आतील भागाबद्दल आणि जेवणाबद्दल चर्चा होती, परंतु आता वातावरण पूर्णपणे बदलले आहे. कपिल-गिन्नीचे चाहते देखील या घटनेबद्दल चिंतेत आहेत.
आम्ही हार मानणार नाही -
दरम्यान, कपिल शर्मा आणि गिन्नीच्या टीमने या प्रकरणावर निवेदन जारी केले आहे. कॅप्स कॅफेच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, 'आम्ही स्वादिष्ट कॉफी आणि मैत्रीपूर्ण संभाषणांतून लोकांना जोडण्याच्या आशेने कॅप्स कॅफे उघडले. हिंसाचाराने त्या स्वप्नाला धक्का बसला हे हृदयद्रावक आहे. या धक्क्यातून आम्ही सावरत आहोत, पण आम्ही हार मानणार नाही. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तुमचे दयाळू शब्द, प्रार्थना आणि DM द्वारे शेअर केलेल्या आठवणी तुमच्या विचारापेक्षा जास्त अर्थपूर्ण आहेत. चला हिंसाचाराच्या विरोधात खंबीरपणे उभे राहूया आणि कॅप्स कॅफे उबदारपणा आणि समुदायाचे ठिकाण राहील याची खात्री करूया. कॅप्स कॅफेमधील आपल्या सर्वांचे आभार आणि लवकरच भेटू. आशा आणि कृतज्ञतेसह #supportkapscafecanada'
याशिवाय, कपिल शर्माच्या टीमने आणखी एका पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'या कठीण काळात सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांच्या जलद प्रतिसाद आणि प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.'
हेही वाचा - कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार; 'या' दहशतवाद्याने स्विकारली जबाबदारी
कॅनडामध्ये कपिलच्या कॅफेवर गोळीबार -
गुरुवारी संध्याकाळी उशिरा एका अज्ञात हल्लेखोराने कपिल शर्माच्या नवीन कॅफेबाहेर गोळीबार केला, ज्यामध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. ही घटना सरे कॅनडामधील कप्स कॅफेच्या सॉफ्ट लॉन्चनंतर घडली. यावेळी कॅफेमध्ये अनेक स्थानिक लोक आणि कर्मचारी उपस्थित होते. कॅनेडियन पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून परिसर सील करण्यात आला आहे.
हेही वाचा - बेटिंग ॲप घोटाळ्यात राणा डग्गुबतीसह 29 कलाकार कायद्याच्या कचाट्यात
दहशतवादी हरजीत सिंग लाडीने कपिल शर्माच्या कॅफेवरील हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. कपिल शर्माच्या काही टिप्पण्यांमुळे तो संतप्त झाला होता, ज्यामुळे त्याने हा गोळीबार घडून आणला. सध्या सरे पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. सुदैवाने या गोळीबारात कॅफेमधील तसेच परिसरातील कोणीही जखमी झालेले नाही.