Russia Earthquake: रशियाच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागात सध्या निसर्गाच्या रौद्र रूपाचा अनुभव येत आहे. एका पाठोपाठ एक नैसर्गिक आपत्ती या भागाला हादरवत आहेत. रविवारी कुरिल बेटांवर 7.0 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला. विशेष म्हणजे, रशियामध्ये 30 जुलैला आलेल्या 8.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर काहीच दिवसांत हा दुसरा मोठा भूकंप झाला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्सुनामीचा इशारा जारी
या भूकंपानंतर लगेचच रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयाने चेतावणी जारी केली. कामचटका द्वीप आणि आजूबाजूच्या किनाऱ्यांवर त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. मंत्रालयाने टेलिग्रामवर संदेश देऊन सांगितले की, 'त्सुनामीच्या लाटांची उंची जरी कमी असली तरीही, खबरदारी म्हणून किनाऱ्यांपासून दूर राहणे आवश्यक आहे.' दुसरीकडे, पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने मात्र या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - जपानी बाबा वांगाचे भाकित खरे ठरले? 1999 मध्येच दिला होता त्सुनामीचा इशारा
600 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक -
या भूकंपाच्या हादऱ्यांनंतर आणखी एक धक्कादायक घटना घडली. 600 वर्षांनंतर कामचटका द्वीपातील क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, हा ज्वालामुखी आता पुन्हा सक्रिय झाला असून त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे. या भागात ज्वालामुखीचा राख आणि लाव्हा स्फोट झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
हेही वाचा - भूकंपाच्या हादऱ्यांनाही हरवता आलं नाही डॉक्टरांचं धैर्य! रशियन डॉक्टरांचा धाडसी व्हिडिओ व्हायरल
रशियाचा पूर्वेकडील भाग सध्या जोरदार भूकंप, त्सुनामीचा संभाव्य धोका आणि ऐतिहासिक ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा तिहेरी तडाखा सहन करत आहे. या सगळ्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना याबाबत सतत सूचना देण्यात येत आहेत. अनेक भागांत आपत्कालीन शिबिरे उभारण्यात आले असून भूप्रदेशीय हालचालींवर वैज्ञानिकांकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.