नाशिक: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या वचनाचा सण. परंतु, नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला गावात याच पवित्र सणाच्या दिवशी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. 3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याच्या बहिणीने जड अंतकरणाने अंतिम संस्काराच्या वेळी भावाच्या मनगटावर राखी बांधून निरोप दिला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला. या घटनेने गावात शोककळा पसरली.
आदल्या दिवशी आयुषच्या 9 वर्षीय बहिणीने आपल्या भावासाठी खास राखी आणि मिठाई आणली होती. ती भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार होती. पण दुर्दैवाने, तिला आपल्या भावाला स्मशानभूमीत राखी बांधावी लागली. या क्षणी उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी हा क्षण अत्यंत कठीण होता.
हेही वाचा - Baramati News: बारामती एमआयडीसी विमानतळाजवळ रेडबर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाचा अपघात
प्राप्त माहितीनुसार, या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तत्काळ शोध मोहीम सुरू केली असून, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, लोकांना घराबाहेर मुलांना एकटे न सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये म्हशीच्या मृत्यूचा अख्ख्या गावाला धसका! रेबीजची लस घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी
रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेने फक्त एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. भावाच्या मृत्यूनंतरही बहिणीने राखी बांधून आपले प्रेम आणि नात्याची अखेरची आठवण जपली, हा क्षण सर्वांच्या मनाला चटका लावणारा ठरला.