नागपूर: नागपूर जिल्ह्यातील वडधामना गावात भारतातील पहिली एआय तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी सुरू करण्यात आली असून, हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. 'मिशन बाल भरारी' अंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य सरकारच्या सहकार्याने या नवोन्मेषी संकल्पनेची अंमलबजावणी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले.
या अंगणवाडीत लहान वयातील मुलांना पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या आणि अधिक प्रभावी पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. बडबडगीत, चित्रकला, नृत्य यांसारख्या कलाकौशल्यांबरोबरच, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व तार्किक क्षमतेचा विकास व्हावा यासाठी विशेषरित्या डिझाइन केलेले व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) हेडसेट्स, स्मार्ट डॅशबोर्ड आणि एआय प्रणाली वापरली जात आहे. मुलांना आभासी घटनेचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे शिकणे अधिक रंजक व आकर्षक झाले आहे.
या प्रणालीचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रगतीवर AI आधारित ट्रॅकिंग सिस्टम कार्य करते. मुलाने दिलेले शिक्षण किती प्रमाणात आत्मसात केले आहे, त्याचे मूल्यांकन होते. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार मदत करणे शक्य होते.सर्वसामान्य अंगणवाडीपेक्षा ही अंगणवाडी स्मार्ट, इंटरऍक्टिव्ह आणि आधुनिक स्वरूपाची आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांना देखील एआय व डिजिटल टूल्स वापरण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या शिक्षण पद्धतीचा योग्य प्रकारे उपयोग होतो आहे.
हेही वाचा: Bank Holiday: ऑगस्टमध्ये 15 दिवस बँका बंद! कोणत्या तारखांना सुट्टी, सविस्तर जाणून घ्या
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील लहानग्यांना खासगी प्रीमियम शाळांइतकेच दर्जेदार शिक्षण मिळावे, अशी आहे. ग्रामीण व शहरी भागातील शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी आणि प्रत्येक मुलाला आनंददायी व कुतूहलजनक शिक्षण देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
या यशस्वी पायलट प्रोजेक्टनंतर नागपूर जिल्हा परिषदने पुढील टप्प्यात आणखी 40 अंगणवाड्यांना AI आधारित शिक्षण प्रणालीने सज्ज करण्याचा संकल्प केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी सांगितले की, भविष्यात प्राथमिक शाळांनाही AI प्रणालीशी जोडण्याची योजना आहे.
या क्रांतिकारी टप्प्यामुळे महाराष्ट्रातील बालशिक्षणात एक ऐतिहासिक बदल घडेल, असा विश्वास प्रशासनाला आहे. शिक्षणाच्या या नव्या पर्वामुळे ग्रामीण भागातील मुलांनाही आधुनिक शिक्षणाची गोडी लागेल आणि त्यांच्यातील सुप्त क्षमता उलगडण्यास मदत होईल. ही केवळ एक अंगणवाडी नाही, तर भविष्याच्या शिक्षणपद्धतीकडे वाटचाल करणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.