मुंबई: विमा पॉलिसी म्हणजे केवळ एक दस्तऐवज नाही, तर ती आपत्तीच्या वेळी आर्थिक आधार असते. मात्र, काही साध्या चुकांमुळे अनेकांना विमा दावा नाकारला जातो. यामुळेच पॉलिसी घेणं पुरेसं नाही. ती समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. खाली आपण विमा दावा नाकारले जाण्याची 5 प्रमुख कारणं, त्यामागचं स्पष्टीकरण आणि ते टाळण्यासाठी योग्य उपाय जाणून घेणार आहोत.
चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणे -
चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणे हे दावा नाकारण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. पॉलिसी खरेदी करताना, लोक अनेकदा त्यांचे वय, उत्पन्न, व्यवसाय किंवा आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती (जसे की धूम्रपान किंवा मद्यपानाच्या सवयी) चुकीची माहिती देतात किंवा लपवतात. त्यामुळे दाव्याच्या वेळी याबाबत कंपनीला समजले तर विमा कंपनी हे 'फसवणूक' समजते आणि दावा थेट नाकारते.
आधीपासून असलेल्या आजारांची माहिती न देणे -
पॉलिसी घेताना, जर तुम्हाला आधीच कोणताही आजार असेल (जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड), तर तो विमा अर्ज फॉर्ममध्ये नमूद करणे आवश्यक आहे. बरेच लोक प्रीमियम वाढण्याच्या भीतीने तो उघड करत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही नंतर त्याच आजाराच्या उपचारांसाठी दावा केला तर विमा कंपनीला ते सहजपणे कळते. त्यामुळे विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते. अनेक आरोग्य विमा पॉलिसींमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी असतो, ज्यानंतरच कव्हर उपलब्ध होते. त्यामुळे विमा घेताना आरोग्यविषयक सर्व माहिती निःसंशयपणे नमूद करा.
हेही वाचा - LIC Saving Plans: एलआयसीच्या 'या' 4 योजनांमध्ये गुंतवा पैसे, आयुष्यभर राहणार नाही पैशांची चिंता
पॉलिसी नूतनीकरणात विलंब -
तुम्ही तुमच्या पॉलिसीचा प्रीमियम वेळेवर भरला नाही, तर तुमची पॉलिसी रद्द होते. प्रत्यक्षात, विमा कंपन्या सहसा प्रीमियम भरण्यासाठी काही अतिरिक्त दिवस देतात. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला किंवा वाढीव कालावधीनंतर कोणतीही वैद्यकीय आणीबाणी उद्भवली आणि पॉलिसी संपली, तर विमा कंपनी दावा देण्यास नकार देते. अशावेळी तुम्ही विमा प्रिमियम भरण्यासाठी स्वयंचलित पेमेंट सेट करा किंवा रिमाइंडर वापरा.
दाव्याची माहिती देण्यात विलंब -
तथापी, विमा पॉलिसीमध्ये, दाव्याची घटना (जसे की रुग्णालयात दाखल होणे किंवा मृत्यू) झाल्यास विमा कंपनीला एका निश्चित वेळेच्या आत माहिती देणे आवश्यक असते. ही वेळ मर्यादा सहसा 24 ते 48 तास असते. जर तुम्ही कोणत्याही वैध कारणाशिवाय विमा कंपनीला वेळेवर माहिती दिली नाही, तर कंपनी तुमचा दावा नाकारू शकते. त्यामुळे पॉलिसीमध्ये नमूद असलेल्या वेळेत विमा कंपनीला याबाबत माहिती द्या.
हेही वाचा - SIP vs FD: एसआयपी की, एफडी? कशात गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे? जाणून घ्या तुमच्या फायद्याची गोष्ट
पॉलिसीच्या अटी न समजणे -
अनेकदा पॉलिसीच्या अटी वाचल्या जात नाहीत आणि एजंटच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे विमा घेणाऱ्याला पॉलिसीच्या अटी आणि शर्तींबद्दल माहिती नसते. त्यामुळे अटींबाहेरचा कव्हरेज असलेला दावा नाकारला जातो. म्हणूनचं पॉलिसीचे संपूर्ण दस्तऐवज नीट वाचा आणि कव्हरेज, अपवाद, प्रतीक्षा कालावधी जाणून घ्या.
विमा ही फक्त सुरक्षा नसून ती एक जबाबदारी आहे. थोडीशी दक्षता आणि पारदर्शकता ठेवली, तर तुमचा दावा सहज मंजूर होऊ शकतो. योग्य माहिती, वेळेवर नोंदणी आणि स्पष्ट प्रक्रिया पालन केल्यास तुम्हाला विम्याचा फायदा नक्कीचं होऊ शकतो. जर तुम्हीही पॉलिसी घेत असाल किंवा घ्यायचा विचार करत असाल, तर वरील मुद्दे नक्की लक्षात ठेवा.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)