मुंबई : सोनं म्हणजे स्त्री धन, सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक असं आपल्या घरातले जाणकार आणि मोठे लोक म्हणायचे तेच खरं, असा अनुभव आता येत आहे. आंतरराष्ट्रीय आणि आशिया खंडातील मार्केट सध्या अस्थिर आहे. सात-आठ महिन्यापूर्वीपर्यंत गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळाला अन् सध्या कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. मार्केटचा अंदाज घेणं खूप कठीण झालं आहे. शेअर्सच्या किमतीमध्ये सतत मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळे सोनंखरेदी हा परत एकदा सुरक्षित परतावा देणारा गुंतवणुकीचा पर्याय ठरत आहे.
सोनं दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत सोनं 90 हजार रुपयांच्या आसपास जाऊ शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. यामुळे सातत्याने दरवाढ होत आहे. येत्या 10 दिवसांतच सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
हेही वाचा - Global Market Crash : ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजार कोसळले, आयात शुल्क वाढीचा जगभरात गुंतवणूकदारांना फटका
मार्केटचा कधी आणि कसा मूड बदलेल याचा अंदाजही येत नाही इतक्या पटकन गोष्टी बदलत असताना मात्र सोन्या चांदीच्या दरातील गुंतवणूक ही फायद्याची ठरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. 10 वर्षांत जवळपास सोन्याच्या दरांनी ग्राहकांना दुपटीहून अधिक रिटर्न्स मिळवून दिले.
गोल्ड रिटर्नकडून आलेल्या रिपोर्टनुसार 10 वर्षांपूर्वी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 4,504.37 रुपये होता. तर आजच्या घडीला तोच दर 8500 रुपयांवर पोहोचला आहे. सध्या सोन्याला आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला आहे. तर 22 कॅरेटचा विचार करायचा झाला तर 1 ग्रॅम सोन्यासाठी 10 वर्षांपूर्वी 4200 रुपये मोजावे लागायचे आजच्या घडीला 7 हजार 700 रुपये मोजावे लागत आहेत.
हेही वाचा - भारतीयांना विमानातून परत पाठवताना हाता-पायांत बेड्या का घातल्या? जयशंकर म्हणाले, “ही अमेरिकेची…”
याशिवाय विविध कर आणि दागिने बनवण्याचा खर्च द्यावा लागणार तो वेगळाच आहे. म्हणजे यासह 1 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी नऊ ते साडेनऊ हजाराच्या आसपास पैसे मोजावे लागणार.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉलर सक्षम करण्यासाठी जाहीर केलेल्या परराष्ट्रीय धोरणांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होत आहे. आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध देश मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे.