Grenade Attack On Punjab BJP Leader
Edited Image
Grenade Attack On Punjab BJP Leader: जालंधर येथील भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड झीशान अख्तर आहे, जो लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने पंजाबमधील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कट रचला. ग्रेनेड फेकणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच हल्ल्यात वापरलेला ई-रिक्षा जप्त करण्यात आला आहे. पोलिस पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडा आणि गँगस्टर हॅपी पासिया यांच्यातील संबंधांचीही चौकशी करत आहेत.
विशेष पोलिस महासंचालक अर्पित शुक्ला यांनी सांगितले की, हा गुन्हा जातीय सलोखा बिघडवण्यासाठी करण्यात आला होता. हे पाकिस्तानच्या आयएसआयचे एक मोठे षड्यंत्र होते. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचा सहकारी झीशान अख्तर यांनी हे षड्यंत्र रचले होते. बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या संभाव्य संबंधांचीही चौकशी केली जात आहे. पंजाब पोलिस केंद्रीय एजन्सींच्या संपर्कात असल्याचे शुक्ला यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा - 26/11 चा सूत्रधार अखेर भारताच्या तावडीत? तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरून अमेरिकन न्यायालयाचा मोठा निर्णय
जालंधर येथील कालिया यांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटात त्यांच्या घराच्या खिडक्या, त्यांची एसयूव्ही आणि अंगणात उभी असलेली मोटारसायकलचे नुकसान झाले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटाच्या वेळी माजी कॅबिनेट मंत्री आणि पंजाब भाजपचे माजी अध्यक्ष कालिया घरी होते.
हेही वाचा - Meerut Murder Case: मेरठ हत्याकांडातील आरोपी मुस्कान गर्भवती; तुरुंगात प्रकृती बिघडल्यानंतर खुलासा
अमृतसरमधील मंदिराबाहेर स्फोट -
गेल्या चार-पाच महिन्यांत अमृतसर आणि गुरुदासपूरमधील पोलिस चौक्यांना लक्ष्य करून बॉम्बस्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, एखाद्या प्रमुख राजकारण्याच्या घराला लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना आहे. गेल्या महिन्यात अमृतसरमधील एका मंदिराबाहेर स्फोट झाला होता.