Uttarkashi Cloudburst Update: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावात मंगळवारी झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत 150 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तथापि, पाऊस आणि भूस्खलनामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तथापी, 28 केरळवासीयांच्या गटासह सुमारे 50 लोक अजूनही बेपत्ता आहेत. वृत्तानुसार, हा गट उत्तरकाशीहून गंगोत्रीला जात होता. गंभीर परिस्थितीनंतर बुधवारी मदत आणि बचावकार्याला वेग आला असला तरी, अखंड पावसामुळे आणि सलग भूस्खलनांमुळे प्रशासनास अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
उत्तरकाशी आपत्ती नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ढिगाऱ्याखालून एक मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाची ओळख आकाश पनवार (35) अशी झाली आहे. ढगफुटीमुळे धाराली गावाचा अर्धा भाग चिखल, माती आणि पाण्यात पूर्णपणे वाहून गेला. तसेच गावातील अनेक घरे, लॉज, वाहणे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत.
हेही वाचा - हिमाचलमध्ये कैलास यात्रेच्या मार्गावर अचानक पूर; ITBP ने वाचवले 413 यात्रेकरूंचे प्राण
केरळहून आलेले 28 पर्यटक अद्याप बेपत्ता -
उत्तरकाशीहून गंगोत्रीला जाणारा 28 जणांचा केरळमधील पर्यटकांचा गट बेपत्ता आहे. त्यांच्याशी मंगळवारी सकाळी 8:30 वाजल्यानंतर कोणताही संपर्क झालेला नाही, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्याच मार्गावर भूस्खलन झाल्याने संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. एनडीआरएफचे डीआयजी मोहसीन शहेदी यांनी सांगितले की, एनडीआरएफचे तीन पथक धारालीकडे रवाना झाली असली तरी ऋषिकेश-उत्तरकाशी महामार्ग बंद असल्याने ते अडकले आहेत. हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य राबवण्याचा प्रयत्न केला गेला, पण खराब हवामानामुळे उड्डाण रद्द करण्यात आले. सध्या लष्कर, आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. दरम्यान, गंगणी परिसरातील लिमछा नदीवरील पूलही पुरात वाहून गेला आहे.
हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे 200 हून अधिक जण बेपत्ता, आतापर्यंत 130 लोकांची सुटका
11 लष्करी जवानही बेपत्ता -
दरम्यान, हर्षिल परिसरात 11 लष्करी जवानही बेपत्ता आहेत. तथापी, 14 राजस्थान रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल हर्षवर्धन 150 सैनिकांसह मदत कार्यात सहभागी झाले आहेत. संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'आमची टीम पूर्ण धैर्याने काम करत आहे. भारतीय लष्कराने MI-17 आणि चिनूक हेलिकॉप्टर तयार ठेवले आहेत, जे हवामान स्वच्छ होताच उड्डाण करतील.'
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आश्वासन दिले आहे की, हवामान सुधारताच बचाव कार्य अधिक गतिमान करण्यात येईल. राज्यात रुद्रप्रयाग, हरिद्वार आणि देवप्रयाग येथे नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. हरिद्वार-देहराडून रेल्वे मार्ग देखील भूस्खलनामुळे बंद करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी हरिद्वार रेल्वे स्थानकावर मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. उत्तरकाशीतील ही आपत्ती केवळ एक स्थानिक घटना न राहता राष्ट्रीय संकट बनली आहे. शासन, लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्या तरी हवामान व अडथळ्यांमुळे बचाव कार्य अत्यंत कठीण झाले आहे.