"हजार जवाबों से अच्छी मेरी खामोशी,
ना जाने कितने सवालों की आबरू रखी."... या काव्य पंक्तीत त्यांच्यातील व्यक्तित्वाचा अंदाज आपल्याला येतो. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्याप्रती श्रध्दांजली अर्पण करताना व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या विविधांगी अष्टपैलू गुणांची आपल्याला ओळख करून देतात... डॉ. मनमोहन सिंग यांच्यातील विनम्रता सर्वपरिचीत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेला एका नव्या क्रांतीच्या युगात आणणाऱ्या या द्रष्ट्या अर्थतज्ज्ञांने आपले संपूर्ण जीवन देशासाठी विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या हिताचा विचार करण्यात अर्पण केले... देशासाठी त्यांनी केलेल्या अर्थविषयक कार्याची आठवण आपण सर्वांनी ठेवायलाच हवी... 1991 मध्ये देशाची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली होती... त्यावेळी धाडसी निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेला नवीन बळ देण्याचे डॉ. मनमोहन सिंग यांचे कार्य वर्षानुवर्षे कोणालाही विसरता येणार नाही...
आज जगात वेगाने विकसित होत असलेला आपला देश जगात एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून भारत उभा आहे, याची पायाभरणी डॉ. मनमोहन सिंग यांनी केली हे कोणीही नाकारू शकत नाही. डॉ. सिंग यांनी 1991 सर्वप्रथम देशाची अर्थव्यवस्था खुली केली, प्रशासनातील लालफितीचा कारभार कमी केला आणि उद्योगांना बंधमुक्त केले. त्यामुळेच देश एका मोठ्या आर्थिक अरिष्टातून सावरू शकला...
राजकारणात निष्कलंक म्हणून ओळख असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या पतंप्रधानपदाच्या काळात झालेल्या काही निर्णयांवर कॅगने ताशेरे ओढले होते... तत्कालिन विरोधकांनी त्यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. विरोधकांच्या आरोपांना त्यांनी संभागृहात अत्यंत शांतपणे उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी बाहेर माध्यमांशीही संवाद साधला होता.
त्यावेळी माध्यमांनी त्यांनी आपल्यावर अनेकदा असे आरोप होवूनही आपण गप्प का राहता? असे विचारताच डॉ. सिंग म्हणाले, "हजार जवाबों से अच्छी मेरी खामोशी, ना जाने कितने सवालों की आबरू रखी."... त्यावेळी भाजपाने त्यांच्यावर व्यवहरातील अनिमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. डॉ. सिंग यांनी त्यावेळी अत्यंत शांतपणे उत्तर देत सांगितले होते की, यूपीए सरकारमध्ये स्पर्धात्मक बोलीद्वारे कोळसा खाणींचे वाटप करण्याचा मूळ प्रस्ताव होता.
मात्र ज्या राज्यांमध्ये भाजपाप्रणित सत्ता होती, त्या राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि डाव्या आघाडीच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केलेला पत्रव्यवहार करून त्यात बदल करण्याच्या सूचना केल्या. त्या राज्यांना आर्थिक फटका बसू नये, त्यावेळी मूळ योजनेला विरोधकांनी केलेला विरोध त्यांनी सभागृहात सांगितला. विरोधकांनी आरोपांचा धुरळा उडवेलला असताना डॉ. सिंग यांनी अत्यंत शांतपणे उत्तरे देत होते. विरोधकांच्याच आग्रहास्तव घेतलेल्या त्या निर्णयांचा पाढा सभागृहात कथन केला. डॉ. सिंग यांच्या उत्तराने विरोधकही त्या मुद्यांवर शांत झाले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान म्हणून आपली स्वतःवर त्याची जबाबदारी घेत विरोधकांचे आरोप कसे बिनबुडाचे आहेत ते त्यांनी पटवून दिले.