नवी दिल्ली: मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या संसदीय बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विशेष कौतुक करत एक ऐतिहासिक बाब अधोरेखित केली. अमित शहा यांनी 2258 दिवस गृहमंत्रीपद भूषवून देशाचे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा मान पटकावला आहे. 2019 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर, 30 मे 2019 रोजी अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 5 ऑगस्ट 2019 रोजीच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील ऐतिहासिक निर्णय घेतला. अमित शाह यांनी कलम 370 रद्द करून जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा संपवण्याची घोषणा संसदेत केली.
अमित शाह यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय -
अमित शहा यांच्या कार्यकाळात गृहमंत्रालयाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यात मुख्यतः
- कलम 370 हटवणे व जम्मू-कश्मीरचे पुनर्गठन
- सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) लागू करणे.
- एनसीआर-एनपीआर बाबत निर्णय
- आंतरिक सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत नक्षलवाद व दहशतवादाविरोधात कठोर भूमिका
हेही वाचा - अतिरेकी मेल्याचं तुम्हाला दुःख झालंय का?; अमित शाह यांचा विरोधकांना सवाल
अमित शाहांनी अडवाणी आणि पंत यांना टाकले मागे -
अमित शहा यांची परखड भाषाशैली, ठोस विधाने, आणि विरोधकांना निर्भीड उत्तर देण्याची शैली सत्ताधाऱ्यांमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण करते. अमित शहा यांनी हा विक्रम प्रस्थापित करताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मागे टाकले, जे 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या काळात 2256 दिवस गृहमंत्री होते. त्याचप्रमाणे, अमित शहांनी काँग्रेसचे गोविंद वल्लभ पंत यांनीही मागे टाकले आहे. पंत हे 10 जानेवारी 1955 ते 7 मार्च 1961 या कालावधीत 6 वर्षे आणि 2256 दिवस गृहमंत्री राहिले होते.
हेही वाचा - गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शाहांचे चरण धुवून एकनाथ शिंदेंनी आशिर्वाद घेतले; राऊतांनी साधला निशाणा
संसद सत्रात कौतुकाचा वर्षाव
एनडीएच्या संसदीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी शहा यांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव करत म्हटले की, गृह मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत जे धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामध्ये अमितभाईंनी घेतलेल्या निर्णयांचा मोठा वाटा आहे. अमित शहा यांचा गृहमंत्री म्हणून कार्यकाळ भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.