Rudrastra Goods Train: भारतीय रेल्वेला ऐतिहासिक यश मिळाले आहे. देशातील आतापर्यंतची सर्वात लांब मालवाहतूक ट्रेन ‘रुद्रस्त्र'ची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः ही माहिती देत ‘रुद्रस्त्र’चा व्हिडिओ X वर शेअर केला. त्यांनी लिहिले, रुद्रस्त्र ही भारतातील 4.5 किमी लांबीची सर्वात लांब मालवाहतूक ट्रेन आहे.
काय आहे रुद्रस्त्र ट्रेनची खासियत?
ही ट्रेन 4.5 किमी लांबीची असून, त्यात 354 वॅगन्स आणि सात इंजिनांचा समावेश आहे. सहा सामान्य मालगाड्यांचे रॅक एकत्र करून ही एकच युनिट बनवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गंजख्वाजा येथून झारखंडमधील गढवा रोडपर्यंतचा 200 किमी प्रवास या ट्रेनने सुमारे पाच तासांत पूर्ण केला. ग्रँड कॉर्ड रेल सेक्शनवर झालेल्या या चाचणीत काही भाग समर्पित फ्रेट कॉरिडॉरवर, तर काही भाग सामान्य ट्रॅकवर पार पडला.
हेही वाचा - रेल्वेची प्रवाशांना खास दिवाळी भेट! परतीच्या प्रवासावर मिळणार तब्बल 20 टक्के सूट
वेळ आणि खर्चात बचत -
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, जर हे सहा रॅक वेगवेगळे चालवले असते तर प्रत्येकासाठी स्वतंत्र क्रू, वेळापत्रक आणि मार्ग आवश्यक झाला असता. एकत्रितपणे चालवल्याने वेळ, मानवी संसाधने आणि ऑपरेटिंग खर्चात मोठी बचत होते. यामुळे मालवाहतूक अधिक जलद आणि किफायतशीर बनते, ज्याचा थेट फायदा देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला होणार आहे.
हेही वाचा - मोदींकडून लाडक्या बहिणींना बारा हजार कोटींची ओवाळणी
तांत्रिक आव्हाने आणि यश -
रुद्रस्त्र चालवण्यासाठी अत्यंत तांत्रिक समन्वय आणि अचूक नियंत्रण आवश्यक होते. पूर्व मध्य रेल्वेच्या DDU विभागाने हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले. हा विभाग मालवाहू वॅगन्सच्या दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणीसाठी प्रसिद्ध आहे. ‘रुद्रस्त्र’ ही भारतातील सर्वात लांब मालगाडी असली तरी, जागतिक विक्रम ऑस्ट्रेलियातील BHP कंपनीकडे आहे. या ट्रेनची लांबी 7.3 किमी आहे. तसेच याल ट्रेनला 682 वॅगन्स आहेत. तरीही, भारतीय रेल्वेची ही कामगिरी जागतिक दर्जाच्या मालवाहतूक ऑपरेशन्सच्या दिशेने एक मोठे पाऊल मानली जात आहे.