Cloudburst in Uttarkashi: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावात सोमवारी पहाटे भीषण ढगफुटी झाली. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये उंच डोंगरावरून आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने घरे, वस्तू आणि झाडे वाहून जाताना दिसत आहेत. अचानक आलेल्या या पुरामुळे संपूर्ण गावात हाहाकार माजला आहे.
उत्तरकाशीतील ढगफुटीचा व्हिडिओ व्हायरल -
ढगफुटीच्या घटनेनंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, नाल्यातून वाहणारे पाणी अचानक वाढते आणि मोठ्या वेगाने खालच्या भागात येते. पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर कचरा, झाडे आणि मातीही वाहून येताना दिसते. यामुळे अनेक इमारतीचे मोठे नुकसान झाले. तथापी, अनेक घरांचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन
स्थानीय लोकांची धावाधाव -
घटनेवेळी अनेक नागरिकांनी पळ काढून स्वत:चा जीव वाचवला, परंतु काहींना वेळेवर सावध होण्याची संधी मिळाली नाही. लोकांचा घाबरलेला आवाज, मदतीसाठी केलेली ओरड ऐकून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे. घटनेनंतर SDRF, NDRF व जिल्हा प्रशासनाच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव आणि शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. उत्तराखंड पोलिसांनी सांगितले की, सर्व पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून, जखमींना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा - जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या याचिकेवर 8 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची प्रतिक्रिया -
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विटद्वारे दुःख व्यक्त करताना सांगितले की, 'धाराली परिसरात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. SDRF, NDRF, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित पथके मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.'