Cockroaches in Air India Flight: एअर इंडियाला पुन्हा एकदा प्रवाशांचा रोष आणि सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. परंतु, यावेळी कारण काहीसे वेगळे आहे. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईमार्गे कोलकाताकडे जाणाऱ्या AI180 फ्लाइटमध्ये प्रवाशांनी कॉकपिटच्या आसपास झुरळे दिसल्याची तक्रार केली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून सोशल मीडियावर लोक एअर इंडियावर टीका करत आहेत.
हेही वाचा - प्रदूषण की विषबाधा? कर्नाटकात एकाच दिवशी 20 मोरांचा संशयास्पद मृत्यू
कॉकपिटमध्ये दिसली झुरळे -
एअर इंडियाच्या निवेदनानुसार, उड्डाणादरम्यान दोन प्रवाशांना काही लहान झुरळे दिसली, ज्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली. क्रू मेंबर्सनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित प्रवाशांना इतर जागांवर हलवले. ज्यानंतर प्रवाशांनी उर्वरित प्रवास सुखरूपरित्या पार केला. फ्लाइट कोलकातामध्ये थांबली असताना, ग्राउंड स्टाफने संपूर्ण विमानाची खोलवर स्वच्छता केली. एअर इंडियाचे म्हणणे आहे की नियमित फ्युमिगेशन होत असले तरी, ग्राउंड ऑपरेशन्सदरम्यान कीटक घुसू शकतात.
हेही वाचा - सरकारचा मोठा निर्णय! 35 अत्यावश्यक औषधांच्या किमतीत कपात
चौकशी सुरू -
दरम्यान, एअरलाइनने सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू असून भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केली जाणार आहेत. तथापी, दुसऱ्या एका घटनेत, भुवनेश्वरहून दिल्लीला जाणारी AI500 फ्लाइट जमिनीवर असामान्य तापमान आढळल्याने तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली. प्रवाशांना शेवटच्या क्षणी याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.