दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज (ता. ८ गुरूवार) रोजी सुरु आहे. यात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. २७ वर्षानंतर भाजपने दिल्लीची सत्ता काबीज करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. या निकालादरम्यान, ‘आप’साठी एक धक्कादायक निकाल आला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे.
आपच्या केजरीवाल यांचा भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभव केला. नवी दिल्ली मतदारसंघामधून दोघेही रिंगणात होते. यात वर्मा यांनी बाजी मारली तर अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. केजरीवाल यांचा पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत भारतीय जनता पक्ष ४६ जागांवर आघाडीवर आहे. तर आपचे उमेदवार २४ जागांवर आघाडीवर आहेत. दिल्लीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध आप यांच्यात प्रमुख लढत झाली होती. या दोन्ही पक्षामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने ‘आप’ला नाकारल्याचे पाहायला मिळत आहे.
पराभव करताच परवेश वर्मांचा गृहमंत्री शाह यांना फोन
अरविंद केजरीवाल यांचा भाजपचे प्रवेश वर्मा यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर लगेच परवेश वर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. शाह यांनी त्यांना त्वरित भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे परवेश वर्मा यांना नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे होते उमेदवार
अरविंद केजरीवाल हे ‘आप’कडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. या निवडणुकीत ‘आप’च्या अस्तित्वासाठी केजरीवाल हेच मुख्य चेहरा होते. त्यांच्याच चेहऱ्यावर ‘आप’ने निवडणूक लढवली होती. त्यांच्या पराभवाने आपला मोठा धक्का बसला आहे.