नवी दिल्ली: तिबेटी आध्यात्मिक नेते आणि गुरु दलाई लामा यांना भारतरत्न देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत खासदारांच्या एका गटाने दलाई लामा यांना भारतरत्न देण्याची मागणी करत केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. या सर्वपक्षीय मंचामध्ये भाजप, बीजेडी आणि जेडीयू सारख्या पक्षांचे खासदार समाविष्ट आहेत. तिबेटसाठीच्या ऑल पार्टी इंडियन पार्लियामेंटरी फोरमने अलिकडेच झालेल्या दुसऱ्या बैठकीत या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला. तसेच याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवले. पत्रात दलाई लामा यांना संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याची परवानगी देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
हेही वाचा - दलाई लामांचा उत्तराधिकारी कधी निवडला जाईल? धार्मिक नेत्याने केला खुलासा
दरम्यान, दलाई लामा यांच्या भारतरत्न नामांकनासाठी फोरमने स्वाक्षरी मोहीम देखील सुरू केली आहे, ज्यामध्ये आतापर्यंत सुमारे 80 खासदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या आहेत. 100 खासदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्यानंतर हे निवेदन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सादर करण्याचे फोरमचे उद्दिष्ट आहे. राज्यसभा खासदार सुजित कुमार यांनी म्हटलं आहे की, 'आमचा गट दलाई लामा यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. आम्ही लोकसभा आणि राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून दलाई लामा यांना संयुक्त अधिवेशनात भाषण करण्याची संधी देण्याची विनंती करू.'
हेही वाचा - 26/11 Mumbai Attack: तहव्वुर राणाने उघडलं तोंड! पाक सैन्याशी असलेल्या संबंधाचा केला खुलासा
दलाई लामा यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांचा 90 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. यानिमित्ताने हजारो भाविक त्सुगलागखांग मंदिराच्या प्रांगणात जमले होते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, राजीव रंजन सिंह, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, सिक्कीमचे मंत्री सोनम लामा आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे यांनीही या समारंभात भाग घेतला बौद्ध नेत्याला पाठिंबा दर्शवला. चीनने तिबेटवर कब्जा केल्यापासून भारतात निर्वासित जीवन जगणारे दलाई लामा तिबेटी समुदायाच्या हक्कांसाठी सतत लढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. परंतु गेल्या आठवड्यात दलाई लामा यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते.