महाकुंभादरम्यान दररोज लाखो भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याला भेट देतील. या काळात त्या संगमात पवित्र स्नान देखील करतील. राष्ट्रपती कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रयागराजच्या त्यांच्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान, राष्ट्रपती संगमात पवित्र स्नान करतील आणि प्रार्थना करतील, असे राष्ट्रपती भवनाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय राष्ट्रपची अक्षयवट आणि हनुमान मंदिरात पूजा आणि दर्शन घेतील. तसेच द्रौपदी मुर्मू डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देतील.
हेही वाचा - दिल्लीतील महिलांना मिळू शकते भाजपच्या नव्या सरकाकडून 'हे' खास गिफ्ट; पहिल्या मंत्रिमंडळात घेतला जाणार निर्णय
संगम परिसरात वाढवण्यात आली सुरक्षा व्यवस्था -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या महाकुंभ भेटीसाठी प्रयागराज प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. त्यांच्या आगमनादरम्यान, संगम परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संपूर्ण परिसरावर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच व्हीआयपी हालचाली लक्षात घेऊन, सामान्य भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर प्रवेश वर्मा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं त्रिवेणी संगमात स्नान -
दरम्यान, यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले होते. पंतप्रधानांनी संगम घाटावर पूजा करून देशाच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली होती. आता राष्ट्रपतींच्या आगमनाने कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढले आहे.
जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम महाकुंभमेळा पौष पौर्णिमा (13 जानेवारी) रोजी सुरू झाला. यामध्ये केवळ देशातीलचं नाही तर जगभरातून पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. महाकुंभमेळा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहील. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि रहस्यमय सरस्वती नद्यांचा संगम होतो. त्यामुळे या ठिकाणाला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे.