श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या लिडवास परिसरात सोमवारी झालेल्या चकमकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाशिम मुसा ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ही चकमक घडली असून लष्कराने या कारवाईत एकूण 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. लष्कर कमांडर मुसासह युनूस आणि आसिफ या तिघांना ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. ही कारवाई भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त प्रयत्नांनी पार पडली. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून ऑपरेशन राबवण्यात आले. चकमकीत मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.
लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्स हँडलवर ऑपरेशनची अधिकृत घोषणा केली. ड्रोनदृष्यांमध्ये तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती देण्यात आली आहे. आजच्या चकमकीत ठार करण्यात आलेले दहशतवादी द रेझिस्टन्स फ्रंटचे सदस्य असल्याचा संशय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख यासिर आणि सुलेमान अशी झाली आहे.
हेही वाचा - Pahalgam Terror Attack: ''न्यायाधीश दहशतवादी प्रकरणांच्या चौकशीतील तज्ज्ञ नाहीत'', याचिकाकर्त्याला ''सर्वोच्च'' फटकार
चकमकीत हाशिम मुसा ठार -
सूत्रांनुसार, या ऑपरेशनमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हाशिम मुसाचाही समावेश आहे. हाशिम 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी होता. या भीषण हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - ‘पाणी थांबवले तर आम्ही अण्वस्त्रांनी उत्तर देऊ...’; पाकिस्तानच्या राजदूताची धमकी
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी हरवनच्या मुलनार भागात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली. सुरक्षा कर्मचारी शोध मोहीम राबवत असताना दूरवरून दोन गोळीबाराचे आवाज ऐकू आले. त्यांनी सांगितले की, या भागात अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आले आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घेराव घातलेल्या भागात दोन ते तीन दहशतवादी मारले गेले.