Pariksha Pe Charcha 2025 Date: बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यंदा 'परीक्षा पे चर्चा' एका नवीन स्वरूपात आणि एका नवीन शैलीत असेल. 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह दीपिका पदुकोण, सद्गुरु, मेरी कोम सारखे सेलिब्रिटी देखील विद्यार्थ्यांना टिप्स देतील. पंतप्रधान मोदींच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची ही आठवी आवृत्ती आहे. या वर्षी तीन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. 'परीक्षा पे चर्चा' या नवीन स्वरूपातील मालिका 10 फेब्रुवारी रोजी प्रसारित होईल.
विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी देणार विद्यार्थ्यांना टिप्स -
पंतप्रधान मोदींसह, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी परीक्षेदरम्यान येणाऱ्या ताणतणावावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना टिप्स देणार आहेत. साधारणपणे, बोर्डाच्या परीक्षेपूर्वी होणाऱ्या या चर्चेत, आतापर्यंत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव दूर करण्याचा मंत्र देताना दिसले आहेत. पण यावेळी हे सेलिब्रिटी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तणावमुक्त राहण्याचे मंत्र देतानाही दिसणार आहेत. या वर्षीचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम अधिक मनोरंजक असणार आहे.
हेही वाचा - शेख हसीना यांच्या भाषणादरम्यान बांगलादेशात उफाळला हिंसाचार; निदर्शकांनी जाळले शेख मुजीबुर रहमान यांचे घर
'परीक्षा पे चर्चा 2025' साठी 3.15 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी -
यावर्षी 'परीक्षा पे चर्चा 2025' साठी विक्रमी नोंदणी झाली आहे. या कार्यक्रमासाठी 3.15 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी, 19.80 लाख शिक्षकांनी आणि 5.20 लाख पालकांनी आधीच नोंदणी केली आहे. यंदा पंतप्रधान मोदींसह 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात खालील सेलिब्रिटी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
हेही वाचा - दिल्लीत भाजपाचे कमळ फुलणार? ; आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात 'हे' दिग्गज साधणार विद्यार्थ्यांशी संवाद -
- सद्गुरु
- दीपिका पदुकोण
- मेरी कोम
- अवनी लेखरा
- रुजुता दिवेकर
- सोनाली सभरवाल
- विक्रांत मास्सी
- भूमी पेडणेकर
- टेक्निकल गुरुजी
- राधिका गुप्ता
परीक्षा पे चर्चा कुठे होणार?
गेल्या वर्षी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. या वर्षीही पंतप्रधान मोदी भारत मंडपममध्येच विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतात. शिक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 'परीक्षा पे चर्चा' हा 'एक्झाम वॉरियर्स'चा या उपक्रमाचा एक भाग आहे. तरुणांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.