Satyapal Malik passes away
Edited Image
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ राजकारणी सत्यपाल मलिक यांचे आज, मंगळवारी दिल्लीत निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दुपारी 1:10 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती अधिकृतरीत्या त्यांच्या X हँडलवरून देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. मे महिन्यात मलिक यांनी रुग्णालयातून फोटो शेअर करत प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती दिली होती. माजी राज्यपालांनी ट्विट केले होते की 'मला माझ्या अनेक हितचिंतकांचे फोन येत आहेत जे मी उचलू शकत नाही. माझी प्रकृती सध्या खूपच वाईट आहे. मी सध्या दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल आहे आणि कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही.'
हेही वाचा - डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर; 8 वर्षांत 14 वेळा पॅरोल
सत्यपाल मलिक यांची राजकीय कारकिर्द -
सत्यपाल मलिक यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत बिहार, जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांत राज्यपाल म्हणून कार्य केले. 2017 मध्ये त्यांनी बिहारचे राज्यपाल, 2018 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल, 2020 मध्ये मेघालयचे राज्यपाल म्हणून काम केले. त्यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी बागपत (उत्तर प्रदेश) येथे झाला होता. त्यांनी भारतीय क्रांती दल, काँग्रेस, जनता दल, लोकदल, समाजवादी पक्ष यासारख्या पक्षांत काम केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा - जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या याचिकेवर 8 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सत्यपाल मलिक हे 1980 ते 1989 पर्यंत राज्यसभा सदस्य, तसेच 1989 मध्ये अलीगड येथून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. देशातील विविध पक्षांतील राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांचे निर्भीड वक्तव्य, स्पष्टवक्तेपणा आणि लोकहितासाठी उचललेली पावले कायम लक्षात राहतील, असे अनेक नेत्यांनी नमूद केले.