Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, अशी आहे ज्ञानेश कुमारांची कारकिर्द
ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते उद्या बुधवारी (ता. १९ फेब्रुवारी) रोजी सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिली. त्यानंतर विधी व न्याय मंत्रालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. ज्ञानेश कुमार हे देशाचे २६ वे निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहतील. दरम्यान, ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत असणार आहे.
ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्ताचीही निवड मोदी यांच्या अध्यक्षेखालील निवड समितीने केली आहे. १९८९ च्या बॅचचे हरियाणा केडर डॉ. विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली. निवडणूक आयुक्त हा पुढे जाऊन मुख्य निवडणूक आयुक्त होतो, असा प्रघात राहिला आहे. ज्ञानेश कुमार हे देखील राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहत होते.
हेही वाचा - दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या तारीखेसंदर्भात आले मोठे अपडेट; 'या' दिवशी होणार शपथविधी
कोण आहेत ज्ञानेश कुमार?
ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या आग्र्यात झाला. त्यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले आहे. केरळमध्ये विविध प्रशासकीय पदांवर काम केल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणूनही भूमिका बजावली आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या विधेयकाच्या मसुदा तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच ते अयोध्येतील राम मंदिर निर्माण समितीचे सदस्यही राहिले आहेत.
हेही वाचा - धक्कादायक! 'या' राज्याच्या गेल्या 4 वर्षात 36000 हून अधिक महिला आणि 8400 हून अधिक मुले बेपत्ता
बिहार, केरळसह या राज्याच्या निवडणुका
बिहार विधानसभा आणि २०२६ मध्ये केरळ आणि पद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुका होणार आहेत. याशिवाय याचवर्षी तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन महत्त्वाच्या राज्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीवर कुमार यांच लक्ष असणार आहे.