नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चावरून अनेकदा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. पंतप्रधान अनेकदा इतर देशांशी संबंध सुधारण्यासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी परदेश दौरे करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत तब्बल 362 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती राज्यसभेत उघड झाली आहे. विरोधकांनी वारंवार या दौऱ्यांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतानाच ही आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने संसदेत सांगितले की 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका आणि फ्रान्ससह पाच देशांच्या दौऱ्यांवर 67 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सदस्य डेरेक ओ'ब्रायन यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्यसभेत ही माहिती दिली. सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या या वर्षी मॉरिशस, सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया, घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाच्या दौऱ्यांची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही.
हेही वाचा - 'मला हिंदी येत नाही, तुम्ही सहमत नसाल तर येथून बाहेर जातो...'; 'या' खासदाराचा संसदेत संतप्त इशारा
प्राप्त माहितीनुसार, 2021 ते 2024 पर्यंत पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर एकूण 295 कोटी रुपये खर्च झाले. दरवर्षी खर्चात वाढ दिसून आली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा खर्च ते कोणत्या देशात जाणार आहेत, किती दिवसांचा दौरा आहे आणि या काळात तेथे काय घडणार आहे यावर अवलंबून असतो. त्यानुसार खर्चाचे व्यवस्थापन केले जाते.
हेही वाचा - राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा! राजनाथ सिंह म्हणाले, 'भारत दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाण्यास तयार'
मोदींचा सर्वात महागडा दौरा -
2014 पासून आतापर्यंत, विशेषतः 2021 नंतरच्या दौऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा सर्वाधिक खर्चिक ठरला आहे. एकूण 74.44 कोटी रुपये अमेरिकेच्या चार दौऱ्यांवर खर्च झाले आहेत. यानंतर फ्रान्स आणि जपान दौऱ्यावर मोठा खर्च करण्यात आला होता. विरोधकांच्या मते, हे दौरे लोकांचा पैसा खर्च करून इव्हेंट व्यवस्थापन करण्याचा भाग आहेत. मात्र, सरकारने म्हटलं आहे की, हे दौरे भारताच्या जागतिक हितासाठी आणि परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.