नवी दिल्ली : भारत सिंगापूरसोबत 10 महत्त्वाचे करार (India Singapore Agreements) करणार आहे. भारत आणि सिंगापूर या आठवड्यात होणाऱ्या दोन्ही देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीत तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास आणि डिजिटलायझेशन यासारख्या क्षेत्रात सुमारे 10 सामंजस्य करारांना अंतिम स्वरूप देण्याच्या दिशेने काम करत आहेत.
पीटीआयच्या वृत्तात या प्रकरणाची माहिती असलेल्या काही लोकांच्या हवाल्याने म्हटले आहे की, कराराअंतर्गत, भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी समुद्राखाली केबल टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावालाही अंतिम स्वरूप दिले जात आहे. ही प्रक्रिया डेटा कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.
सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग पुढील महिन्यात भारताला भेट देऊ शकतात. त्यापूर्वी या सर्व प्रस्तावांना अंतिम रूप देण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज (ISMR) ची तिसरी बैठक 13 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे, ज्यामध्ये लॉरेन्स वोंग यांच्या भेटीची तयारी केली जाईल.
हेही वाचा - FASTag Annual Pass: फास्टॅगच्या वार्षिक पासवर आता 7 हजार रुपयांपर्यंत बचत; काय आहे ऑफर जाणून घ्या
भारतातून सिंगापूरला ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन निर्यात करण्याचा प्रस्ताव देखील आहे. याकडे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी समग्र दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव ISMR अंतर्गत सिंगापूरच्या सहा मंत्र्यांना भेटतील.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर भेटीदरम्यान, भारत-सिंगापूर संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात आले होते. भारत आणि सिंगापूरमधील बैठकीत कौशल्य विकासाशी संबंधित करारांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये विमान वाहतूक, सेमीकंडक्टर आणि प्रगत उत्पादन यासारख्या क्षेत्रातील सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम आणि त्यावर उपाय यावर देखील ISMR मध्ये चर्चा होऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, दोन्ही देश दरवर्षी सुमारे 1,00,000 भारतीयांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने एका योजनेवर काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, भारतात सिंगापूरच्या कंपन्यांची गुंतवणूक कशी वाढवायची यावरही ISMR मध्ये चर्चा केली जाईल.
पहिली ISMR बैठक 17 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे झाली. यामध्ये सिंगापूरच्या चार मंत्र्यांनी भारताला भेट दिली. दुसरी बैठक 26 ऑगस्ट 2024 रोजी सिंगापूर येथे झाली. आगामी ISMR मध्ये दोन्ही देशांमधील एकूण व्यापाराला चालना देणे, हे देखील एक प्रमुख धोरण असण्याची शक्यता आहे.
अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या भारत-अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. मात्र, भारताने कणखर भूमिका घेत देशहिताला प्राधान्य देत असल्याचे अमेरिकेला सुनावले आहे. तेव्हा, हा करार ट्रम्प आणि अमेरिकेसाठी धक्का ठरेल, असे मानले जात आहे.
सिंगापूर हा ASEAN (आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ) मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तो भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीचा (FDI) एक प्रमुख स्रोत आहे. या पार्श्वभूमीवर या करांराना महत्त्व आहे.
हेही वाचा - खासदारांसाठी दिल्लीतील नवे आलिशान फ्लॅट; पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन