Wednesday, August 20, 2025 10:38:28 AM

भारताची सागरी ताकद वाढणार! 26 ऑगस्टला उदयगिरी आणि हिमगिरी युद्धनौका नौदलात दाखल होणार

या दोन्ही युद्धनौका वेगवेगळ्या भारतीय शिपयार्डमध्ये बांधल्या गेल्या आहे. तसेच अशा प्रकारे एकाच वेळी दोन प्रतिष्ठित शिपयार्डमधील युद्धनौका कार्यान्वित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारताची सागरी ताकद वाढणार 26 ऑगस्टला उदयगिरी आणि हिमगिरी युद्धनौका नौदलात दाखल होणार
Warships Udayagiri and Himgiri
Edited Image

नवी दिल्ली: भारतीय नौदलासाठी 26 ऑगस्ट 2025 हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. या दिवशी एकाच वेळी दोन आघाडीच्या युद्धनौका उदयगिरी (F35) आणि हिमगिरी (F34) नौदलात सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही युद्धनौका वेगवेगळ्या भारतीय शिपयार्डमध्ये बांधल्या गेल्या आहे. तसेच अशा प्रकारे एकाच वेळी दोन प्रतिष्ठित शिपयार्डमधील युद्धनौका कार्यान्वित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताची ताकद - 

ही कामगिरी भारताच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांच्या संरक्षण क्षेत्रातील यशाची प्रचिती आहे. युद्धनौका बांधणीमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा आणि उत्पादन क्षमतेचा उत्कृष्ट संगम या प्रकल्पातून दिसून येतो.

उदयगिरी आणि हिमगिरी युद्धनौकांची बांधणी कोणी केली?

प्रोजेक्ट 17 ए स्टेल्थ फ्रिगेट्सचे दुसरे जहाज, उदयगिरी हे मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने बांधले आहे. दुसरीकडे, हिमगिरी, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE), कोलकाता यांनी बांधलेल्या P17A जहाजांपैकी पहिले आहे.

हेही वाचा - RBI चा नवा नियम! मृत ग्राहकांचे दावे 15 दिवसांत निकाली काढावे लागणार; विलंब केल्यास बँकांना भरावा लागेल दंड

युद्धनौकांची खास वैशिष्ट्ये - 

P17A युद्धनौका 6700 टन वजनाच्या असून, पूर्वीच्या शिवालिक-श्रेणी युद्धनौकांपेक्षा सुमारे 5 % मोठ्या आहेत. यामध्ये कमी रडार क्रॉस सेक्शन आणि अधिक सुव्यवस्थित डिझाइन आहे. यात CODOG प्रोपल्शन सिस्टम डिझेल इंजिन आणि गॅस टर्बाइनचा संगम आहे. या युद्धनौकांचे संचालन एकात्मिक प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (IPMS) द्वारे करण्यात आले आहे. तथापी, शस्त्र संचात सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, मध्यम-श्रेणी पृष्ठभाग ते हवेत क्षेपणास्त्रे, 76 मिमी एमआर गन, 12.7 मिमी क्लोज-इन वेपन सिस्टम आणि अँटी-सबमरीन/पाण्याखालील शस्त्र प्रणालींचे संयोजन समाविष्ट आहे.

हेही वाचा - नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! CBSE ने दिली 'ओपन बुक असेसमेंट'ला मान्यता

स्वावलंबनाचा नवा टप्पा -

उदयगिरी आणि हिमगिरीची यशस्वी बांधणी हे भारताच्या नौदल स्वावलंबनाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. याच वर्षी इतर स्वदेशी जहाजे आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी, आयएनएस वागशीर, आयएनएस अर्नाला आणि आयएनएस निस्तार देखील नौदलात सामील होणार आहेत. या युद्धनौकांमुळे केवळ भारतीय नौदलाची ताकद वाढवणार नाही, तर भारताच्या समुद्री संरक्षण क्षमतेत ऐतिहासिक भर पडणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री