नवी दिल्ली: दिल्लीतील ग्राहक मंचाने इंडिगो एअरलाइन्सला मोठा दंड ठोठावला आहे. एका महिला प्रवाशाला घाणेरडी आणि अस्वच्छ सीट दिल्याप्रकरणी एअरलाइन्सला 1.5 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे प्रकरण पिंकी नावाच्या महिला प्रवाशाशी संबंधित असून, तिने बाकू (अझरबैजान) ते नवी दिल्ली या उड्डाणात प्रवास केला होता.
पिंकी यांनी तक्रार केली की, त्यांना दिलेली सीट अत्यंत अस्वच्छ होती. शिवाय, याबाबत तिने कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांनीही योग्य वर्तन केले नाही. तथापी, इंडिगोने सांगितले की, प्रवाशाला तात्काळ दुसरी सीट देण्यात आली आणि तिने प्रवास निर्विघ्न पूर्ण केला. मात्र, ग्राहक मंचाने सादर झालेल्या पुराव्यांवरून इंडिगोच्या सेवेत कमतरता असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा - पर्यावरण संवर्धनासाठी काशी विश्वनाथ ट्रस्टचा मोठा निर्णय; आजपासून मंदिर परिसरात प्लास्टिकवर पूर्ण बंदी
दरम्यान, ग्राहक मंचाने इंडिगोला मानसिक त्रास, शारीरिक वेदना यासाठी 1.5 लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला, तसेच खटला लढण्यासाठी 25 हजार रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले. तसेच इंडिगोने एसडीडी (सिच्युएशन डेटा डिस्प्ले) अहवाल सादर केला नाही, हेही मंचाने आपल्या आदेशात नमूद केले. हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे ज्यामध्ये विमान ऑपरेशन्स आणि प्रवाशांशी संबंधित घटनांचा रेकॉर्ड ठेवला जातो. या अहवालाच्या अनुपस्थितीमुळे इंडिगोचा खटला खूपच कमकुवत झाला आणि निर्णय प्रवाशाच्या बाजूने आला.
हेही वाचा - PM Kisan Samman Nidhi Yojana: 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही PM किसान योजनेचा 21वा हप्ता; जाणून घ्या
काही दिवसांपूर्वी दिल्ली ते न्यूयॉर्क जाणाऱ्या विमानात अशाच स्वरुपाची घटना घडली होती. एका महिला प्रवाशाला सीटवर घाण आणि दुर्गंधी असल्याचा अनुभव आला. तिने केबिन क्रूला तक्रार केली, पण योग्य प्रतिसाद न मिळाल्याने तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. नंतर नागरी उड्डाण महानिदेशालयाने (DGCA) चौकशी केली आणि एअर इंडियाला दंड ठोठावला. एअरलाइन्सने प्रवाशाला मोफत तिकीट आणि आर्थिक भरपाई दिली, तसेच संबंधित फ्लाइट क्रूवर कारवाई केली.