Air India plane skids off runway प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
कोची: या वर्षी एअर इंडियाच्या विमानांना सातत्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अहमदाबादमधील अपघात, तांत्रिक बिघाड आणि प्रवाशांच्या तक्रारींनंतर आता पुन्हा एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान AI2744 सोमवारी सकाळी मुसळधार पावसात लँडिंग दरम्यान घसरले. ही घटना सकाळी 9:27 वाजण्याच्या सुमारास घडली.
धावपट्टी अत्यंत ओलसर आणि निसरडी असल्याने विमानाने लँडिंगनंतर आपले नियंत्रण गमावले व ते थेट धावपट्टीबाहेर गेले. यामध्ये विमानाचे तीन चाके फुटली, तर इंजिनलाही किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तातडीने आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा - ''बेजबाबदार वृत्तांकनासाठी WSJ आणि Reuters ने माफी मागावी...''; पायलट फेडरेशनची मागणी
दरम्यान, एअर इंडियाने यावर निवेदन देताना सांगितले, प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सध्या हे विमान तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी (09/27) काही वेळेसाठी बंद करण्यात आली होती, तर दुसरी धावपट्टी (14/32) तातडीने सुरु करून अन्य उड्डाणांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? AAIB च्या तपास अहवालात मोठा खुलासा
एअर इंडिया आता या घटनेची सखोल चौकशी करत असून तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्याशिवाय हे विमान पुन्हा सेवेत आणले जाणार नाही. तथापी, एअर इंडियाने सध्या हे विमान उड्डाणांमधून काढून टाकले आहे. तज्ञांची एक टीम विमानाची कसून तपासणी करत आहे. जोपर्यंत सर्वकाही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आढळत नाही, तोपर्यंत हे विमान पुन्हा उड्डाण सेवेत दाखल केले जाणार नाही.