नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जैतपूर भागात भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक यंत्रणांसह एनडीआरएफची टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी तैनात आहे. ही भिंत सुमारे 50 फूट लांब होती.
जैतपूर पोलिस स्टेशन परिसरात शनिवारी सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास हरी नगर गावाच्या मागे मोहन बाबा मंदिराजवळ बांधलेल्या झोपडपट्टीवर भिंत कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले.
हेही वाचा - मोदी सरकारने लोकसभेतून आयकर विधेयक मागे घेतले; 11 ऑगस्टला सादर करण्यात येणार नवीन विधेयक
पोलिस आणि स्थानिक लोकांनी ढिगाऱ्याखाली गाडलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. एकूण 8 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जणांना एम्स आणि सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये चार पुरुष, दोन महिला आणि दोन मुले आहेत. सध्या यापैकी 7 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.