Heat In March: या वर्षी मार्च महिन्यात नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. संपूर्ण महिनाभर सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे. या अति उष्णतेमुळे गहू पिकाचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे त्याचे उत्पादन कमी होऊ शकते. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. शुक्रवारी हवामान खात्याच्या अधिकृत अंदाजापूर्वी आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, यावर्षी मार्च महिन्यात विक्रमी उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात लागणार उन्हाचे चटके -
महिन्याभरात बहुतेक दिवस आणि रात्री तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिवसाचे तापमान वाढण्याची अपेक्षा आहे आणि महिन्याच्या अखेरीस अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान 40 अंश ओलांडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Mumbai: वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम
उष्णतेचा गहू उत्पादनावर परिणाम-
सलग तीन वर्षे खराब पीक आल्यानंतर आयात टाळण्यासाठी भारत 2025 मध्ये चांगले पीक घेण्याची आशा बाळगत आहे. तथापि, अति उष्णतेमुळे सलग चौथ्या वर्षी कमी उत्पादन होऊ शकते, ज्यामुळे पुरवठ्यातील कमतरता दूर करण्यासाठी सरकारला आयातीवरील 40% कर कमी करून किंवा रद्द करून आयातीला परवानगी द्यावी लागेल. तथापी, 2022 मध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अचानक उष्णतेमुळे गव्हाचे पीक खराब झाले होते, ज्यामुळे देशांतर्गत पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी भारताला गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालावी लागली.
हेही वाचा - गव्हाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय! साठवणुकीची नवीन मर्यादा केली निश्चित
हवामान खात्याच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर आणि मध्य भारतातील गहू उत्पादक राज्यांमध्ये मार्चच्या मध्यापासून तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चमधील हवामान गहू, हरभरा आणि तेलबियांसाठी अनुकूल राहणार नाही, कारण त्यांच्यावर उष्णतेचा परिणाम होऊ शकतो. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान पेरलेली ही हिवाळी पिके थंड तापमानावर अवलंबून असतात.
सध्याच्या उष्णतेच्या परिस्थितीमुळे आणि पुरवठ्यात घट झाल्यामुळे या महिन्यात देशांतर्गत गव्हाच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात उष्णतेची तीव्रता होती. परंतु, आता जर मार्च महिन्या आणखी उष्णता वाढली तर, याचा गव्हाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे नवी दिल्लीतील एका व्यापाऱ्याने सांगितले.