Wednesday, August 20, 2025 02:02:57 PM

Cloudburst Hits Sukhi Village: उत्तराखंडमध्ये निसर्गाचा कोप! धरालीनंतर सुखी गावातही ढगफुटी

धाराली गावानंतर सुखी गावात ढगफुटीची घटना घडली. ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पूरामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला.

cloudburst hits sukhi village उत्तराखंडमध्ये निसर्गाचा कोप धरालीनंतर सुखी गावातही ढगफुटी
Cloudburst In Sukhi Village
Edited Image

Cloudburst Hits Sukhi Village: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तरकाशीमध्ये आणखी एका ठिकाणी ढगफुटीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. धाराली गावानंतर सुखी गावात ढगफुटीची घटना घडली. या आपत्तीत सुमारे 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ही घटना खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात घडली. ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पूरामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, स्थानिक प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक तातडीने बचाव कार्यात गुंतले आहे. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, 'आयबेक्स ब्रिगेड' तातडीने घटनास्थळी पोहोचली असून, बाधित भागाचा आढावा घेऊन बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. नुकसानाचे नेमके प्रमाण अद्याप निश्चित केले जात असून, मदत व पुनर्वसन कार्य सुरू आहे. लवकरच अधिकृत अपडेट्स दिले जातील, असं सेंट्रल कमांडच्या निवेदनात सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींनी व्यक्त केला शोक - 

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की, धाराली (उत्तरकाशी) प्रदेशात ढगफुटीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची बातमी अत्यंत दुःखद आणि त्रासदायक आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित पथके युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करतो. 

हेही वाचा - Cloudburst in Uttarkashi: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी! अनेक इमारती वाहून गेल्या, पहा थरारक दृश्य

मुसळधार पावसाचा इशारा जारी -  

तथापी, स्थानिक हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून वारंवार ढगफुटीच्या घटना घडत असून, पर्वतीय भागातील लोकसंख्येवर याचा गंभीर परिणाम होत आहे. प्रशासनाने या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री