नवी दिल्ली: आज अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन, अदानी पॉवर, एनडीटीव्ही आणि अंबुजा सिमेंट्सचे शेअर्सही घसरले आहेत. यासोबतच, एडब्ल्यूएल अॅग्री बिझनेस आणि एसीसीचे शेअर्स थोड्याशा वाढीसह व्यवहार करत आहेत. द वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन व्यावसायिक वृत्तपत्रातील एका वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकन अधिकारी गौतम अदानीच्या कंपन्यांची चौकशी करत आहेत. अदानीच्या कंपनीवर मुंद्रा बंदरातून इराणमधून भारतात एलपीजी गॅस आयात केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा - गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेत लाच प्रकरणात मिळाली क्लीन चिट
अदानी ग्रुपने फेटाळले आरोप -
तथापि, अदानी ग्रुपने हे आरोप फेटाळले आहेत. तसेच कंपनीने शेअर बाजाराला असेही सांगितले की, त्यांनी जाणूनबुजून कोणत्याही प्रकारे निर्बंधांचे उल्लंघन केलेले नाही आणि इराणसोबत एलपीजीचा व्यापार केलेला नाही. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की गुजरातमधील मुंद्रा बंदर आणि पर्शियन आखात दरम्यान धावणाऱ्या टँकरमध्ये अशा काही क्रिया दिसून आल्या आहेत, ज्या निर्बंधांपासून वाचण्यासाठी केल्या जातात. वृत्तानुसार, अमेरिकन न्याय विभाग काही एलपीजी टँकरची चौकशी करत आहे, ज्यांनी अदानी एंटरप्रायझेसला माल पोहोचवल्याचा आरोप आहे. अदानी ग्रुपने हे आरोप खोटे, निराधार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाचा गौतम अदानींना मोठा दिलासा! 388 कोटी रुपयांच्या बाजार नियमन उल्लंघन प्रकरणात निर्दोष मुक्तता
दरम्यान, अदानी एंटरप्रायझेसने म्हटले आहे की, ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून आम्ही एलपीजी खरेदी करतो त्यांच्याशी आमचा स्पष्ट करार आहे. या संपूर्ण घटनेनंतर मंगळवारी अदानी ग्रुपचे बहुतेक शेअर्स क्रॅश झाले. मंगळवारी, अदानी ग्रुपचे शेअर्स 1 ते 2.5 टक्क्यांनी घसरले.