नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बाबा खरक सिंह मार्गावरील संसद सदस्यांसाठी बांधलेल्या नव्या आलिशान फ्लॅट्सचे उद्घाटन केले. हे 184 टाइप-7 बहुमजली फ्लॅट्स खास डिझाइनसह उभारले गेले असून, त्यामध्ये 5 खोल्या, कार्यालयासाठी स्वतंत्र जागा, तसेच खासदारांच्या वैयक्तिक सहाय्यकासाठी सुविधा देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी फ्लॅट्स बांधणाऱ्या कामगारांची भेट घेतली आणि त्यांचे कौतुक केले.
विशेष डिझाइन आणि सुविधा -
प्रत्येक फ्लॅट सुमारे 5 हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा आहे. यामध्ये खासदार आणि त्यांच्या सहाय्यकासाठी स्वतंत्र कार्यक्षेत्र तर सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी 2 खोल्या दिल्या आहेत. प्रत्येक खोलीत स्वतंत्र बाथरूमची सुविधा आहे. उल्लेखनीय म्हणजे हे फ्लॅट विटांनी बांधलेले नसून आरसीसी आणि अॅल्युमिनियमच्या अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून उभारले गेले आहेत, ज्यामुळे हे बांधकाम 100० वर्षांपेक्षा अधिक काळ टिकेल, असा दावा करण्यात येत आहे.
हेही वाचा - मानहानीच्या प्रकरणात मेधा पाटकर यांची शिक्षा कायम
टॉवर्सना नद्यांची नावे -
या निवासी संकुलात कृष्णा, गोदावरी, कोसी आणि हुगळी हे चार टॉवर्स आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, ही नावे भारतातील चार महान नद्यांचे प्रतीक असून ते संसद सदस्यांच्या एकतेचे आणि राष्ट्रसेवेचे द्योतक आहेत.
हेही वाचा - भारताची सागरी ताकद वाढणार! 26 ऑगस्टला उदयगिरी आणि हिमगिरी युद्धनौका नौदलात दाखल होणार
पार्किंग आणि इतर सुविधा -
या प्रकल्पासाठी सुमारे 550 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. संकुलात 500 वाहनांसाठी पार्किंगची सोय असून, त्यासाठी दुमजली भूमिगत पार्किंग बांधण्यात आले आहे. याशिवाय टाइप-8 बंगल्यांपेक्षा या फ्लॅट्समध्ये अधिक जागा उपलब्ध आहे, ज्यामुळे खासदारांना अधिक सोयीस्कर व आधुनिक सुविधा मिळतील. या नव्या निवासी संकुलामुळे संसद सदस्यांना अत्याधुनिक, प्रशस्त आणि पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध होणार असून, हे प्रकल्प आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण ठरणार आहे.