नवी दिल्ली: भारतीय हवाई दल येत्या 23 ते 25 जुलैदरम्यान राजस्थानातील बारमेर ते जोधपूर या पाकिस्तानी सीमेला लागून असलेल्या भागात महत्त्वाचा युद्धसराव करणार आहे. या सरावात राफेल, सुखोई-30, मिराज 2000 आणि जग्वार यांसारखी आघाडीची लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा भाग रणनैतिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. याच भागात पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र याआधी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले होते, मात्र भारतीय हवाई दलाने त्यांना यशस्वीरित्या निष्प्रभ केले होते.
प्रवासी विमानांची उड्डाणे बंद
या सरावाच्या पार्श्वभूमीवर संबंधित हवाई क्षेत्रासाठी NOTAM जारी करण्यात आले आहे. यामुळे या कालावधीत प्रवासी विमानांना या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी असेल, जेणेकरून हवाई दलाची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सरावादरम्यान कोणत्याही अडथळ्याशिवाय उड्डाण करू शकतील.
हेही वाचा - मोठी दुर्घटना टळली! एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरले, 3 टायर फुटले
दरम्यान, हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, हा सराव पूर्वनियोजित आणि नियमित प्रशिक्षणाचा भाग आहे. यात जमिनीवरील आणि हवाई लक्ष्यांवर हल्ले, तसेच रात्रीचे ऑपरेशन्स यांचा समावेश असेल. हा सराव युद्धस्थितीच्या संभाव्य परिदृश्यांचे अनुकरण करणार असून भारताची सीमावर्ती सज्जता अधोरेखित करणार आहे.
हेही वाचा - इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; 40 मिनिटे हवेतचं घिरट्या घालत राहिले
नोटम केव्हा जारी केला जातो?
नोटम जारी केल्यानंतर, कोणत्याही प्रवासी विमानाला संबंधित हवाई क्षेत्रात उड्डाण करण्याची परवानगी नसते. अशा परिस्थितीत, हवाई दलाची विमाने मुक्तपणे उड्डाण करू शकतात. सरावादरम्यान ड्रोन शोधणे, त्यांचा नाश करणे, क्षेपणास्त्र मार्गदर्शन यांचा सराव होतो.