Cancer Test Kit: भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा सर्वात धोकादायक आजार मानला जातो. उशिरा निदान झाल्यामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो. यामागील एक मोठे कारण म्हणजे महागड्या आणि वेळखाऊ तपासण्या. पण आता एम्सच्या डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. त्यांनी असे निदान किट तयार केले आहे, जे फक्त 100 रुपयांत आणि अवघ्या 2 तासांत कर्करोग शोधू शकते.
काय आहे या किटची खासियत?
आतापर्यंत कर्करोग तपासणीसाठी लाखो रुपयांच्या मशीनची आवश्यकता होती. तसेच रिपोर्ट मिळवण्यासाठी जास्त दिवस लागायचे. पण हे नवीन नॅनो तंत्रज्ञानावर आधारित किट सोपे, स्वस्त आणि जलद आहे. यासाठी मोठ्या यंत्रांची आवश्यकता नसून निकाल केवळ दोन तासांत समजतो. या किटची किंमत फक्त 100 रुपये असल्यामुळे हे किट सर्वसामान्य महिलांसाठी उपलब्ध होणार आहे.
एम्सच्या डॉक्टर आणि संशोधकांच्या टीमने हे किट विकसित केले आहे. यात शरीरशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सुभाष चंद्र यादव, स्त्रीरोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. नीरजा भटला, तसेच ज्योती मीना, शिखा चौधरी आणि प्रणय तन्वर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या किटची 400 रुग्णांवर चाचणी घेण्यात आली असून रिपोर्टमध्ये 100% अचूकता दिसून आली आहे.
हेही वाचा - Cancer Detection With Diamonds: कर्करोग तपासणीसाठी हिरे ठरणार गेमचेंजर; ब्रिटिश संशोधकांनी लावला अजब शोध
पूर्वी खाजगी रुग्णालयात कर्करोगाच्या चाचणीची किंमत सुमारे 6 हजार रुपये, तर सरकारी रुग्णालयात 2 हजार ते 3 हजार रुपये होती. पण आता ही चाचणी अवघ्या 100 रुपयांमध्ये शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, 2025 च्या राष्ट्रीय जैव उद्योजकता स्पर्धेत या किटला देशातील सर्वोत्तम नवोपक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कोण वापरू शकेल?
डॉक्टरांच्या मते हे किट इतके सोपे आहे की ते डॉक्टर, परिचारिका आणि आशा वर्कर्स देखील वापरू शकतात. ग्रामीण भागातील महिलांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे, कारण महागड्या तपासण्या आणि उशिरा मिळणारे उपचार हा तिथला मोठा प्रश्न आहे. मात्र, हे किट स्व-चाचणीसाठी सध्या उपलब्ध नसेल.
हेही वाचा - Eat Raw Tomato Everyday : दररोज एक तरी कच्चा टोमॅटो खा.. हृदयासाठी आश्चर्यकारक फायद्यांसह मूडही होईल फ्रेश
किटचे महत्त्व
दरवर्षी भारतात हजारो महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडतात. परंतु, वेळेवर चाचणी आणि उपचार केले तर हा आजार टाळता येतो. एम्सच्या या क्रांतिकारी शोधामुळे स्वस्त आणि जलद निदान शक्य होईल आणि अनेकांचे प्राण वाचतील.