नवी दिल्ली: भारताच्या आर्थिक गुन्हेगारीच्या इतिहासातील एक मोठ्या प्रकरणाची घडामोड समोर आली आहे. पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. आरोपी मेहुल तब्बल मेहुल चोक्सी पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता.
एका वृत्तानुसार, बेल्जियममध्ये राहत असलेल्या चोक्सीला अँटवर्पमध्ये अटक करण्यात आली असून, ही कारवाई सीबीआयच्या विनंतीवरून 12 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली.
बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या दोन अटक वॉरंटचा आधार घेत ही कारवाई केली. हे वॉरंट अनुक्रमे 23 मे 2018 व 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आले होते. पोलिसांनी अटक करताना चोक्सी सध्या अँटवर्पमधील तुरुंगात असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याच्या प्रकृतीच्या कारणावरून जामिनाची मागणी होण्याची शक्यता असून, भारतीय यंत्रणा सतर्क आहेत.
मेहुल चोक्सी व त्याचा पुतण्या नीरव मोदी या दोघांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेला 13,850 कोटी रुपयांचा फटका दिला होता. नीरव मोदी अजूनही लंडनमध्ये लपून बसला असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे. दुसरीकडे, चोक्सीच्या अटकेनंतर भारत सरकारला आणि तपास यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ईडीकडून चोक्सीच्या 2565 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई झाली असून, त्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी पीएमएलए कोर्टाची परवानगी मिळाली आहे. लवकरच या लिलावातून बँकांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.