नवी दिल्ली: दिल्लीतील पत्रकार परिषदेत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर थेट आरोप करत मतदार यादीतील त्रुटींवर आणि मतदान प्रक्रियेतील फसवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाली असून मतांची चोरी करण्यात आली आहे. राहुल गांधी म्हणाले, गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदारांची भर पडली. मतदानानंतर संध्याकाळी 5 नंतर अचानक मोठ्या प्रमाणावर मते पडू लागली. तसचे निकालांमध्ये कमाल तफावत दिसून आली. हे सर्व प्रकार संशयास्पद आहेत.
राहुल गांधींनी सादर केले 'मतांच्या चोरी'चे आकडे -
डुप्लिकेट मतदार: 11,965
खोटे पत्ते: 40,009
एका पत्त्यावर अनेक मतदा: 10452
एका घरात 80 मतदार
दरम्यान, राहुल गांधींनी प्रत्यक्ष स्लिप्स दाखवून सांगितले की, काही स्लिप्समध्ये घर क्रमांक '0' असा नमूद आहे. काही ठिकाणी मतदारांचा फोटोच नाही, तर काही ठिकाणी वडिलांचे नाव इंग्रजी-अर्धवट लिहिलेले आहे. अनेक मतदार वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकाच नावाने नोंदवलेले आहेत.
हेही वाचा - ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण म्हणजे 'आर्थिक ब्लॅकमेलिंग'; राहुल गांधींनी मोदींना दिला 'हा' सल्ला
आयोग डेटा का लपवत आहे? राहुल गांधींचा सवाल
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदार डेटा देत नाही, त्यामुळे सत्य तपासणे कठीण होते. जर डेटा डिजिटल स्वरूपात मिळाला असता, तर 30 सेकंदांत आम्ही सत्य उघड करू शकलो असतो. आयोग हेतुपुरस्सर पारदर्शकता टाळतोय, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही; ट्रम्प यांच्या 50 टक्के कराच्या धमकीवर मोदींचे प्रत्युत्तर
तथापी, राहुल गांधी यांनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर संगनमताचे आरोप करत सांगितले की, मतांची चोरी ही भाजपच्या विजयाचा भाग बनली आहे. एक्झिट पोल वेगळं काही सांगतात आणि निकाल काहीतरी वेगळंच येतात. हे स्वीकारणं अशक्य आहे. राहुल गांधींचे हे आरोप भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात. आता यावर निवडणूक आयोग काय उत्तर देईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.