PM Modi honour Mitra Vibhushan
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी संयुक्तपणे समपूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे आभासी उद्घाटन केले. तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित केले. यासंदर्भात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'आज राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते श्रीलंका मित्र विभूषणने सन्मानित होणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा केवळ माझा सन्मान नाही तर 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. भारत आणि श्रीलंकेतील ऐतिहासिक संबंध आणि खोल मैत्रीचा हा सन्मान आहे. या सन्मानाबद्दल मी राष्ट्रपती, श्रीलंका सरकार आणि येथील जनतेचे आभार मानतो.'
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी बँकॉकमधील भगवान बुद्ध मंदिरात केली पूजा; नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा
पंतप्रधान म्हणून मोदींचा श्रीलंकेचा चौथा दौरा -
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 'पंतप्रधान म्हणून श्रीलंकेचा हा माझा चौथा दौरा आहे. 2019 मधील माझा शेवटचा दौरा अतिशय संवेदनशील वेळी झाला होता. त्यावेळी मला विश्वास होता की, श्रीलंका उदयास येईल आणि आणखी मजबूत होईल. श्रीलंकेच्या लोकांच्या संयमाचे आणि धाडसाचे मी कौतुक करतो आणि आज श्रीलंकेला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर पाहून मला आनंद होत आहे. भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण एक खरा शेजारी आणि मित्र म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली आहेत.'
हेही वाचा - चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरीच मुंबई दौऱ्यावर
आम्ही आमच्या भागीदार देशांच्या प्राधान्यांनाही महत्त्व देतो -
भारताने सबका साथ, सबका विकास हे स्वप्न स्वीकारले आहे. आम्ही आमच्या भागीदार देशांच्या प्राधान्यांनाही महत्त्व देतो. गेल्या 6 महिन्यांतच आम्ही 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या कर्जांचे अनुदानात रूपांतर केले आहे. आमचा द्विपक्षीय कर्ज पुनर्गठन करार श्रीलंकेच्या लोकांना तात्काळ मदत आणि दिलासा देईल. आज आम्ही व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून दिसून येते की भारत आजही श्रीलंकेच्या जनतेसोबत उभा आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं.