PM Modi inaugurates Kartavya Bhavan
Edited Image
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 'कर्तव्य भवन 3' या कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट इमारतीचे उद्घाटन केले. ही इमारत सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून दिल्लीतील दहा नवीन केंद्रीय सचिवालय इमारतींपैकी ही पहिली कार्यरत इमारत आहे. दिल्लीतील सध्या विखुरलेल्या विविध मंत्रालये आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नावीन्य आणि सहकार्य वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. कर्तव्य भवन 3 मध्ये गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, ग्रामीण विकास, एमएसएमई, डीओपीटी, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, तसेच प्रधान वैज्ञानिक सल्लागार (PSA) यांची कार्यालये स्थलांतरित केली जातील.
जुन्या इमारतीचे संग्रहालयात रूपांतर -
कर्तव्य भवन तयार झाल्यानंतर उत्तर आणि दक्षिण ब्लॉकमधील मंत्रालये याठिकाणी हलवली जातील. यामुळे रायसीना हिलवरील दोन ऐतिहासिक ब्लॉक संग्रहालयांमध्ये रूपांतरित केले जाणार आहे. ते भारतीय पौराणिक आणि आधुनिक इतिहासाचे प्रदर्शन करतील.
हेही वाचा - हिमाचलमध्ये कैलास यात्रेच्या मार्गावर अचानक पूर; ITBP ने वाचवले 413 यात्रेकरूंचे प्राण
शास्त्री भवन, कृषी भवन, उद्योग भवन आणि निर्माण भवन यासारख्या जुन्या इमारतींमध्ये सध्या अनेक मंत्रालये कार्यरत आहेत. या सर्व इमारती 1950 ते 1970 च्या दशकात बांधण्यात आल्या असून, त्या आता संरचनात्मकदृष्ट्या जुन्या आणि अकार्यक्षम ठरत आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट (CCS) अंतर्गत एकूण 10 इमारती बांधण्याची योजना आखली आहे. यातील इमारत क्रमांक 2 आणि 3 चे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील महिन्यांत त्यांचे उद्घाटन अपेक्षित आहे. तर इमारत क्रमांक 10 एप्रिल 2026 पर्यंत, आणि 6 व 7 क्रमांकाच्या इमारती ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा - Trump Warns India For Tariff: पुढील 24 तासांत मोठा टॅरिफ बॉम्ब टाकणार; ट्रम्प यांची भारताला धमकी
तात्पुरते कार्यालय स्थलांतर
बांधकाम पूर्ण होईपर्यंत, शास्त्री भवन, कृषी भवन आणि अन्य जुन्या इमारतींतील कार्यालये कस्तुरबा गांधी मार्ग, मिंटो रोड आणि नेताजी पॅलेस येथील चार नवीन ठिकाणी दोन वर्षांसाठी तात्पुरती स्थलांतरित करण्यात येणार आहेत. पुनर्विकास योजनेत काही महत्त्वाच्या इमारती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात राष्ट्रीय संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार, जवाहरलाल नेहरू भवन, डॉ. आंबेडकर सभागृह आणि वाणिज्य भवन यांचा समावेश आहे.