Monday, September 01, 2025 07:41:36 AM

'दुश्मन बॉर्डरपारच नसतो; घरातही असतो' पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्रासह सहा जण अटकेत

लोकप्रिय युट्युबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवत असल्याचा आरोप; 'Travel with Jo' चॅनेलच्या आड गुप्त मिशन चालू असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा.

दुश्मन बॉर्डरपारच नसतो घरातही असतो पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्रासह सहा जण अटकेत

नवी दिल्ली: 'दुश्मन सिर्फ बॉर्डर के उस पार नहीं होता; घर के अंदर भी होता है' हा एका चित्रपटातील डायलॉग आता सत्यात उतरल्याची प्रचिती आली आहे. पाकिस्तानसाठी संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली हरियाणातील प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा उर्फ ज्योती राणी आणि इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ‘Travel with Jo’ नावाचे युट्युब चॅनेल चालवणाऱ्या ज्योतीचे लाखो फॉलोवर्स आहेत, मात्र तिच्या लोकप्रियतेआड ती गुप्त मिशन पार पाडत होती, हे उघडकीस आले आहे.

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हरियाणा आणि पंजाबमध्ये पसरलेल्या गुप्तचर जाळ्याचा पर्दाफाश केला असून, त्यात ज्योतीसह नौमान इलाही, देवेंद्र सिंग ढिल्लों, गुजाला, बानू नसीरिना, यामीन मोहम्मद आणि अर्मान यांना अटक केली आहे. या सर्वांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 152 आणि ‘Official Secrets Act 1923’ च्या कलम 3, 4, व 5 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीने 2023 मध्ये एजंटमार्फत व्हिसा मिळवून पाकिस्तान दौरा केला होता. ती तिथे गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली. दानिश नावाच्या अधिकाऱ्याने तिची ओळख अली अहवान, शाकीर उर्फ राणा शाहबाज आणि अन्य पाकिस्तानी एजंटांशी करून दिली. तिने शाकीरचा नंबर 'जट रंधवा' या नावाने सेव्ह केला होता, जेणेकरून कुणाला संशय येणार नाही.

ज्योतीने WhatsApp, Telegram, आणि Snapchat सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानशी संवेदनशील माहिती शेअर केली होती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापूर्वी ती श्रीनगर आणि पहलगाममध्ये होती, असेही निष्पन्न झाले आहे.

युट्युबवर तिने पाकिस्तानमधील प्रवासाचे व्हिडीओ पोस्ट केले होते. एका व्हिडीओत तिने म्हटले होते, 'सीमेवरून पाकिस्तानात जाताना अंगावर शहारे येतात.' तिच्या या कथित रोमांचक सफरीमागे गुप्त हेतू दडलेला होता.

भारतीय सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिशला 'persona non grata' घोषित करत 24 तासांत देश सोडण्याचा आदेश दिला. ज्योतीच्या कबुलीनंतर तिच्याविरोधातील केस हिसारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

ही कारवाई केवळ एक हेरगिरी प्रकरण नसून, भारतीय समाजातील दुर्बल घटकांना भावनिक, आर्थिक आणि खोट्या आश्वासनांनी फसवून शत्रू राष्ट्रासाठी काम करण्यास भाग पाडण्याचा प्रकार आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही मोठी चेतावणी असून, सोशल मीडियाच्या आड दडलेल्या 'घरातल्या' शत्रूंपासून सावध राहण्याची वेळ आली आहे.
 


सम्बन्धित सामग्री