Thursday, August 21, 2025 12:04:10 AM

रेल्वेची प्रवाशांना खास दिवाळी भेट! परतीच्या प्रवासावर मिळणार तब्बल 20 टक्के सूट

रेल्वे बोर्डाने गर्दी टाळण्यासाठी आणि तिकीट बुकिंगचा त्रास कमी करण्यासाठी ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना जाहीर केली आहे.

रेल्वेची प्रवाशांना खास दिवाळी भेट परतीच्या प्रवासावर मिळणार तब्बल 20 टक्के सूट
Edited Image

नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दिवाळीच्या काळात परतीच्या तिकिटांवर तब्बल 20 टक्के सूट मिळणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात घरी जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने गर्दी टाळण्यासाठी आणि तिकीट बुकिंगचा त्रास कमी करण्यासाठी ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना जाहीर केली आहे.

रेल्वे बोर्डाच्या मते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी दोन्ही बाजूंची (ये-जा) तिकिटे एकाच वेळी बुक करावी लागतील. तिकिटांवरील प्रवाशांची माहिती सारखी असावी आणि दोन्ही प्रवास एकाच वर्गात व एकाच स्टेशन जोडीतून (O-D जोडी) असावेत. फ्लेक्सी फेअर गाड्या वगळता सर्व श्रेणींमध्ये व सर्व गाड्यांमध्ये ही सूट लागू असेल. विशेष गाड्या (ऑन डिमांड ट्रेन) यामध्ये समाविष्ट असतील.

ही सवलत कधी मिळणार?

ही सवलत 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत होणाऱ्या प्रवासासाठी आणि 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानच्या परतीच्या प्रवासासाठी लागू असेल.

हेही वाचा - 'D'mart मध्ये अधिकाधिक डिस्काउंट मिळवायचाय? या 'S'mart टिप्स कामाला येतील

सवलत मिळविण्यासाठी महत्त्वाच्या अटी - 

- तिकीट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही.

- तिकिटात कोणताही बदल किंवा दुरुस्ती होणार नाही.

- सवलतीसह इतर कोणतीही सवलत, व्हाउचर, कूपन, पास किंवा पीटीओ स्वीकारले जाणार नाही.

- दोन्ही बाजूंची तिकिटे एकाच माध्यमातून बुक करावी लागतील (ऑनलाइन किंवा काउंटरवर) 

- पीएनआर चार्ट तयार करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

हेही वाचा - FD VS RD : 5 वर्षांत बचतीवर अधिक कमाई कशी कराल? जाणून घ्या सविस्तपणे

रेल्वे बोर्डाच्या या योजनेमुळे प्रवाशांचा ताण कमी होण्याबरोबरच दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवास अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर होणार आहे. यामुळे केवळ तिकिटांच्या उपलब्धतेचा प्रश्न सुटणार नाही, तर प्रवासाचाही अनुभव अधिक सुखद होईल. रेल्वे प्रशासनाच्या मते, यामुळे गर्दीचे नियोजन चांगल्या पद्धतीने होईल. 
 


सम्बन्धित सामग्री