नवी दिल्ली: तुमचा मोबाईल फोन कधी हरवला किंवा चोरीला गेला आहे का? जर हो, तर तुम्हाला माहिती असेल की, यामुळे तुम्हाला किती अडचणींना सामोरे जावे लागते. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण सरकारच्या दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या 'संचार साथी' या उपक्रमामुळे भारतभरात आतापर्यंत 5.35 लाखांहून अधिक हरवलेले किंवा चोरीलेले फोन सापडले आहेत. संचार साथी हा उपक्रम दूरसंचार विभाग राबवत असून याचा उद्देश मोबाईल चोरी, फसवणूक आणि अन्य डिजिटल गुन्हे रोखणे हा आहे.
संचार साथी अॅपची वैशिष्ट्ये
संशयास्पद कॉल किंवा मेसेजची तक्रार: वापरकर्ते त्यांच्या कॉल किंवा मेसेज लॉगमधून थेट संशयास्पद क्रियांची तक्रार करू शकतात.
तुमच्या नावाचे कनेक्शन तपासा: कोणत्या नावावर किती मोबाइल नंबर नोंदणीकृत आहेत हे पाहता येते. तसेच बनावट किंवा अज्ञात नंबर ब्लॉक करता येतात.
हरवलेला/चोरी झालेला फोन ब्लॉक करता येतो: फोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्याला रिमोटली ब्लॉक करता येते व तो ट्रेस करता येते, ज्यामुळे गैरवापर टाळला जातो.
हेही वाचा - पर्यावरण संवर्धनासाठी काशी विश्वनाथ ट्रस्टचा मोठा निर्णय; आजपासून मंदिर परिसरात प्लास्टिकवर पूर्ण बंदी
उपक्रमाचे यश आणि परिणाम
संचार साथी उपक्रमाद्वारे आतापर्यंत 1 कोटींहून अधिक अनधिकृत मोबाइल कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. तसेच, 'चक्षू' नावाच्या वैशिष्ट्याद्वारे 29 लाखांहून अधिक संशयास्पद नंबर निष्क्रिय करण्यात आले आहेत. आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (FRI) देखील सुरू करण्यात आला असून, त्याद्वारे 34 बँका व वित्तीय संस्थांनी 10.02 लाख बँक खाती गोठवले आहेत.
हेही वाचा - ICICI बँकेचा सर्वसामान्यांना मोठा धक्का! आता बचत खात्यात ठेवावे लागतील किमान 50 हजार रुपये
अधिकाऱ्यांच्या मते, सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे सायबर गुन्हे व फसवणूक मोठ्या प्रमाणावर रोखता आली आहे. संचार साथी अॅप इंग्रजी, हिंदी आणि 21 भारतीय भाषांमध्ये गुगल प्ले स्टोअर व अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. 2023 मध्ये संचार साथी पोर्टल लाँच झाले आणि नंतर 17 जानेवारी 2024 रोजी मोबाईल अॅप देखील सुरु करण्यात आले. हा उपक्रम डिजिटल इंडिया मिशनचा भाग असून, नागरिकांना सुरक्षित डिजिटल सेवा देण्याचा प्रयत्न आहे.