Yes Bank Case: येस बँकेतील वादग्रस्त गुंतवणुकीच्या प्रकरणात अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. रिलायन्स म्युच्युअल फंडकडून 2020 पूर्वी येस बँकेच्या अतिरिक्त टियर-1 (AT-1) बॉण्ड्समध्ये केलेल्या 2,035.89 कोटींच्या गुंतवणुकीवरून सुरू झालेल्या सेबीच्या तपासात गंभीर निष्कर्ष समोर आले आहेत. बाजार नियामक सेबीने अंबानींनी गुन्हा न कबूल करता तोडगा काढण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. त्यामुळे अंबानींवर आणि त्यांच्या मुलगा जय अनमोल अंबानीवर आता 1,828 कोटींचा दंड आकारला जाऊ शकतो.
या बातमीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर दिसून दिसून आला. बुधवारी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 4.92% घसरले आणि BSE वर 41.73 या नीचांकी पातळीवर पोहोचले. तथापी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्सही 5% घसरून 257.55 वर पोहोचले, जे नंतर 260.95 वर स्थिरावले. अंबानी सध्या दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळावर नसले तरी ते प्रमुख प्रवर्तक आहेत.
हेही वाचा - अनिल अंबानींना ED चे समन्स; रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स कोसळले
सेबीच्या म्हणण्यानुसार, येस बँकेने अंबानी समूहाच्या इतर कंपन्यांना दिलेल्या कर्जाच्या बदल्यात ही AT-1 बॉण्ड गुंतवणूक करण्यात आली होती. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांचे नुकसान झाले, ज्याचा अंदाज 1,828 कोटी इतका आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) नेही लक्ष घातले असून, त्यांनी अंबानींना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. ED ने काही ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त केली आहेत.
हेही वाचा - Anil Ambani: अनिल अंबानींच्या मालमत्तांवर ईडीचे छापे
दरम्यान, सेबीच्या तपासात हेही उघड झाले आहे की, अनिल अंबानी यांनी रिलायन्स म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक धोरणांवर थेट प्रभाव टाकला होता. फंड हाऊसचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि माजी मुख्य जोखीम अधिकारी यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता आहे. एकूणच, येस बँक प्रकरणामुळे आता अनिल अंबानींच्या अडचणी वाढणार आहेत.