Shubhanshu Shukla Space Mission Experience: भारतीय अंतराळवीर आणि हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आपले अंतराळ प्रवासातील अनुभव शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, 'अंतराळ मोहीम ही खरोखरच भयानक असते, पण तुमच्या मागे एक विश्वासू टीम असते ज्यांच्यावर तुम्ही तुमचे आयुष्य सोपवता.' दिल्लीतील मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शुक्ला हे अॅक्सियम मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) दोन आठवडे राहिले होते. ते या मोहिमेचे पायलट आणि कमांडर होते.
अॅक्सियम मोहिमेतील अनुभव -
दोन आठवड्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग केले. तसेच अंतराळातील विशेष छायाचित्रणही केले. त्यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी व्यापक प्रशिक्षण घेतले होते. भीती सगळ्यांनाच वाटते, पण तुमच्या टीमवरचा विश्वास हा त्या भीतीवर मात करण्यासाठी पुरेसा होता.
गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाचा धडा -
शुभांशू शुक्ला यांनी स्पष्ट केले की या अनुभवामुळे भारताच्या गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाचे धडे मिळाले आहेत. त्यांनी सांगितले की, मानवी अंतराळ मोहिमेत मिळालेले ज्ञान आणि अनुभव अमूल्य आहे. हे प्रशिक्षण व पुस्तके वाचून मिळत नाही, ते प्रत्यक्ष अनुभवातूनच शिकता येते. त्यांनी पुढे सांगितले की अंतराळात दीर्घकाळ राहिल्यावर शरीरात अनेक बदल होतात.
हेही वाचा - ‘Agni 5’ Ballistic Missile : भारताने घेतली अग्नी-5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
गगनयान मोहीम -
इस्रोची गगनयान मानवी अंतराळ मोहीम 2027 मध्ये पार पडणार आहे. यात हवाई दलाचे तीन वैमानिक, ज्यात शुभांशू शुक्ला यांचाही समावेश आहे, यांना 400 किमी कक्षेत तीन दिवस ठेवण्यात येईल. त्यानंतर हे अंतराळयान हिंदी महासागरात उतरेल. या मोहिमेचा खर्च 20,194 कोटी रुपये आहे. ही मोहिम यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत हा चौथा देश ठरेल, जो माणसांना अंतराळात पाठवेल.
हेही वाचा - Uran Boat Sinked : महत्त्वाची बातमी! उरणच्या समुद्रात बोट बुडाली; बचावकार्य सुरू
गगनयान मोहिमेमुळे भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्यास मदत होईल, संशोधन व विकास क्षेत्रात नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि अंतराळ उद्योगात जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याची संधी मिळेल. शुभांशू शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, लवकरच आपण आपल्या रॉकेटमधून, आपल्या कॅप्सूलमधून आणि आपल्या भूमीवरून माणसाला अंतराळात पाठवू. हा क्षण भारतासाठी अभिमानास्पद असेल.