Sanitation Workers Honour: दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष होतो. पण यंदा दिल्लीसाठी हा दिवस आणखीन खास ठरणार आहे. कारण, राजधानीतील 50 स्वच्छता कर्मचारी आणि त्यांचे पती-पत्नी यांना यावर्षी लाल किल्ल्यावर होणाऱ्या मुख्य समारंभात ‘विशेष पाहुणे’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हा उपक्रम त्यांच्या दैनंदिन कठोर परिश्रमाला आणि समर्पणाला एक अनोखा सलाम मानला जात आहे.
विशेष पाहुण्यांची निवड प्रक्रिया -
दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) आपल्या प्रत्येक झोनमधून एकूण 5 स्वच्छता कर्मचारी निवडणार आहे. यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असेल. अशा प्रकारे एकूण 10 झोनमधून 50 कर्मचारी निवडले जातील. निवडलेले कर्मचारी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर त्यांच्या जोडीदारांसह उपस्थित राहतील.
हेही वाचा - Independence Day 2025: 2025 मध्ये नेमका कितवा स्वातंत्र्यदिन साजरा होणार? 78 वा की 79 वा? जाणून घ्या
एमसीडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे आमंत्रण स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवेला आणि समर्पणाला सलाम करण्यासाठी आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिले आहे, त्यासाठी हा छोटा पण मनापासूनचा सन्मान आहे.
निवड कशी होणार?
प्रत्येक झोनमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे निश्चित केली जातील. ही नावे व संबंधित माहिती डीईएमएस (पर्यावरण व्यवस्थापन सेवा विभाग) मुख्यालयाला पाठवली जाईल. निवडलेल्या गटासोबत एक स्वच्छता निरीक्षक किंवा उच्च दर्जाचा अधिकारीही असेल.
सन्मानाचा संदेश
हा उपक्रम केवळ औपचारिक आमंत्रण नसून, एक सामाजिक संदेश देखील देतो. जे लोक दररोज रस्ते, गल्ली आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी अथक मेहनत घेतात, ते आपल्या समाजाचे खरे योद्धे आहेत. त्यांना मंचावर आणणे म्हणजे त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांना योग्य तो सन्मान देणे होय.
हेही वाचा - भारतीय रेल्वेचे मोठे यश! 4.5 किलोमीटर लांबीची मालगाडी 'रुद्रस्त्र'ची यशस्वी चाचणी, पहा व्हिडिओ
यंदाच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर या 50 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उपस्थितीचा क्षण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. हा उपक्रम केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, कारण यातून स्पष्ट होते की सेवा आणि प्रामाणिकपणाला नेहमीच योग्य मान मिळायला हवा.