पश्चिम बंगाल: राज्यात वक्फ (दुरुस्ती) कायदा लागू केला जाणार नाही, अशी घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. कोलकाता येथे जैन समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना बॅनर्जी म्हणाल्या की, त्या अल्पसंख्याक लोकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करतील. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'मला माहित आहे की तुम्ही वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीवर नाराज आहात. विश्वास ठेवा, बंगालमध्ये असे काहीही घडणार नाही, ज्यामुळे कोणीही विभाजन करून राज्य करू शकेल. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी लोकांना राजकीय चळवळ सुरू करण्यास चिथावणी देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका,' असे आवाहनही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केले.
तथापी,मंगळवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरून झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, 'बांगलादेशच्या सीमावर्ती भागातील परिस्थिती पहा. ते (वक्फ विधेयक) आता मंजूर व्हायला नको होते. बंगालमध्ये 33 टक्के अल्पसंख्याक आहेत. मी त्यांचे काय करू? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, यावेळी ममता बॅनर्जी यांनी अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, 'इतिहास आपल्याला सांगतो की बंगाल, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत हे सर्व एकत्र होते. फाळणी नंतर झाली आणि इथे राहणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करणे हे आपले काम आहे.'
हेही वाचा - 'नवीन कायद्यात वक्फच्या पवित्र भावनांचे रक्षण केले जाईल'; पंतप्रधान मोदींचा दावा
याशिवाय, ममता बॅनर्जी यांनी एकतेच्या शक्तीवरही भर देताना सांगितले की, जर लोक एकत्र उभे राहिले तर ते बरेच काही साध्य करू शकतात. काही लोक तुम्हाला एकत्र येऊन आंदोलन सुरू करण्यास उद्युक्त करतील. मी तुम्हा सर्वांना आवाहन करेन की हे करू नका. कृपया लक्षात ठेवा की जेव्हा दीदी (बॅनर्जी) इथे असतील तेव्हा त्या तुमचे आणि तुमच्या मालमत्तेचे रक्षण करतील. आपण एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे, असं आवाहनही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केलं.
हेही वाचा - Waqf Act Come Into Force: मोठी बातमी! आजपासून देशात नवीन वक्फ कायदा लागू
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालेल्या चर्चेनंतर वक्फ (दुरुस्ती) विधेयक 3 एप्रिल रोजी लोकसभेत आणि दुसऱ्या दिवशी पहाटे राज्यसभेत मंजूर झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी या विधेयकाला मान्यता दिली.