नवी दिल्ली: देशाच्या राजधानीतून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या मयिलादुथुराई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आर. सुधा या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या असता, पोलिश दूतावासासमोर एका दुचाकीस्वाराने त्यांची सोन्याची साखळी हिसकावली. ही घटना 4 ऑगस्टच्या सकाळी घडली. विशेष म्हणजे हा परिसर उच्च सुरक्षा विभाग मानला जातो. आर. सुधा यांच्यासोबत त्या वेळी राज्यसभेच्या खासदार राजथी देखील उपस्थित होत्या.
हेह वाचा - सरकारचा मोठा निर्णय! 35 अत्यावश्यक औषधांच्या किमतीत कपात
नेमक काय घडलं?
आर. सुधा यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले की, त्यांचे अधिकृत निवासस्थान अद्याप तयार नसल्याने त्या तामिळनाडू भवनात राहत आहेत. त्या नेहमीप्रमाणे सकाळी फेरफटक्यावर गेल्या असता, पोलिश दूतावासाच्या गेट 3 आणि 4 जवळ अचानक एक हेल्मेटधारी बाईकस्वार आला. त्याने गळ्यातील साखळी हिसकावली आणि तो घटनास्थळावरून पसार झाला.
हेही वाचा - Shibu Soren Death: झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह -
या घटनेमुळे आर. सुधा यांच्या मानेला दुखापत झाली आहे. त्यांनी त्वरित मदतीसाठी आरडाओरडा केला आणि काही वेळाने दिल्ली पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलिसांनी तक्रार देण्यासाठी त्यांना थेट ठाण्यात जाण्यास सांगितले. दरम्यान, गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आर. सुधा यांनी राजधानीतील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जर एक महिला खासदारही चाणक्यपुरीसारख्या सुरक्षित क्षेत्रात सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांनी कुठे सुरक्षित वाटावं? महिला खासदारांनी गुन्हेगारांना त्वरित अटक करून सोन्याची साखळी परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.