नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण एअर इंडिया AI-171 विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालावर आधारित काही अंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी 'दिशाभूल करणाऱ्या' बातम्या प्रसारित केल्या, असा आरोप फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (FIP) ने केला आहे. या प्रकरणात वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) आणि रॉयटर्स यांच्यावर पायलट फेडरेशनने कायदेशीर नोटीस बजावली असून खुली माफी मागण्याची मागणी केली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सचे अध्यक्ष कॅप्टन सीएस रंधावा यांनी म्हटलं आहे की, या दोन्ही माध्यम संस्थांच्या अहवालांना तथ्यात्मक आधार नाही आणि त्यामुळे वैमानिकांची प्रतिमा खराब झाली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या एआय-171 विमान अपघातात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सध्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ऑफ इंडिया या प्रकरणाची चौकशी करत आहे.
कॅप्टन रंधावा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी वॉल स्ट्रीट जर्नलला पूर्णपणे जबाबदार धरतो. या वृत्तसंस्था स्वतःचे निष्कर्ष काढतात आणि अशा बातम्या जगभर पसरवतात. त्या तपास संस्था आहेत का? जेव्हा अहवालात असे काहीही लिहिलेले नाही, तेव्हा ते स्वतःचे निष्कर्ष कसे काढू शकतात? असा सवाल रंधावा यांनी केला आहे.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? AAIB च्या तपास अहवालात मोठा खुलासा
वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सनी माफी मागावी
दरम्यान, फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सने वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सना त्यांच्या अहवालांबद्दल सार्वजनिकपणे माफी मागावी आणि त्यांच्या अहवालाबद्दल स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. कॅप्टन रंधावा यांनी म्हटलं आहे की, आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की जर त्यांनी माफी मागितली नाही आणि स्पष्टीकरण दिले नाही तर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू.
हेही वाचा - अहमदाबाद अपघातासंदर्भात संसदीय समिती नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांशी करणार चर्चा
AI-171 विमान अपघातावर माध्यमांची घाईगडबड -
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षा जेनिफर होमंडी यांनीही या अपघाताबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवर म्हटले होते की हे घाई आणि अनुमानांवर आधारित आहेत. इतक्या मोठ्या तपास प्रक्रियेला वेळ लागतो आणि भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोच्या अधिकृत चौकशीचे निकाल येईपर्यंत प्रत्येकाने वाट पाहावी. तथापी, भारताचे AAIBI यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिकृत निष्कर्ष अद्याप जाहीर झालेले नाहीत.