Paracetamol Side Effects: ताप, डोकेदुखी किंवा शरीरदुखी झाली की आपण सहजपणे पॅरासिटामोल किंवा इबुप्रोफेन घेतो. ही औषधे भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ओव्हर-द-काउंटर (OTC) औषधांपैकी एक आहेत. पण अलीकडच्या एका अभ्यासातून या औषधांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की ही औषधे आपल्या शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधकता वाढवत आहेत.
अँटीबायोटिक प्रतिरोध म्हणजे काय?
अँटीबायोटिक प्रतिरोध म्हणजे बॅक्टेरियामध्ये असे बदल होणे की ज्यामुळे अँटीबायोटिक्स निष्प्रभ ठरतात. परिणामी मूत्रमार्गाचा संसर्ग, न्यूमोनिया, किंवा साध्या जखमाही धोकादायक ठरतात आणि उपचार करणे कठीण होते. डॉक्टरांच्या मते, हे आजच्या काळातील सर्वात मोठे आरोग्य आव्हान आहे.
संशोधनात काय आढळले?
संशोधकांनी पॅरासिटामोल आणि इबुप्रोफेन यांची चाचणी अँटीबायोटिक सिप्रोफ्लोक्सासिनसोबत केली. प्रयोगात ई. कोलाई (E. Coli) या बॅक्टेरियामध्ये अधिक उत्परिवर्तन (Mutations) आढळले. या प्रक्रियेमुळे बॅक्टेरिया अँटीबायोटिक्सच्या विरोधात अधिक शक्तिशाली झाले. केवळ सिप्रोफ्लोक्सासिनच नव्हे, तर इतर अँटीबायोटिक्सदेखील कमी प्रभावी ठरू लागल्या.
हेही वाचा - Brain Health: रोजच्या डाएटमध्ये 'हे' ड्रायफ्रुट्स समाविष्ट करा आणि आपल्या मेंदूला बनवा सुपरफास्ट
सुरक्षित समजली जाणारी औषधे आता धोकादायक का?
पॅरासिटामोल आणि इबुप्रोफेन शरीरातील बॅक्टेरियांवर दबाव टाकतात. दबावाखाली बॅक्टेरिया स्वतःचे रक्षण करण्यासाठी उत्परिवर्तन करतात. जेव्हा दोन्ही औषधे एकत्र घेतली जातात तेव्हा ही प्रक्रिया अधिक वेगाने घडते. जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने Antimicrobial Resistance (AMR) ला आधीच जागतिक आरोग्य संकट म्हटले आहे. 2019 मध्येच या समस्येमुळे जगभरात 12.7 लाख लोकांचा मृत्यू झाला. तज्ज्ञांचा इशारा आहे की, योग्य नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात साध्या आजारांवरही उपचार अशक्य होऊ शकतात.
हेही वाचा - Citrus Fruits Health Benefits: रोगप्रतिकारकशक्तीपासून ते त्वचेची चमक वाढवण्यापर्यंत लिंबूवर्गीय फळे खाण्याचे फायदे, जाणून घ्या..
काय करावे?
औषधे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
किरकोळ ताप किंवा वेदना झाल्यावर लगेच औषध घेणे टाळावे.
अँटीबायोटिक्स आणि वेदनाशामक औषधांचा अनावश्यक वापर थांबवणे आवश्यक आहे.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)